Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या आगमनासाठी बनवा भाज्यांपासून खास गोडधोड पदार्थ…

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी हा आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा पवित्र उत्सव आहे. या काळात घराघरांत तसेच मोठ्या मंडपांत गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवस भक्तगण पूजाअर्चा, भजन-कीर्तन, आरती करीत मंगलमय वातावरण निर्माण करतात. बाप्पाला नैवेद्य म्हणून गोडधोड पदार्थांचा विशेष मान असतो. मोदक आणि बेसनाचे लाडू हे पारंपरिक नैवेद्य असले तरी यंदा तुम्ही थोडे वेगळे करून भाज्यांपासून बर्फी तयार करून बाप्पाला अर्पण करू शकता.
चला तर पाहूया काही खास भाज्यांच्या बर्फी रेसिपी :
१) दुधी भोपळ्याची बर्फी
दुधी भोपळा स्वच्छ धुवून साल काढा आणि किसून घ्या.
एका भांड्यात दूध गरम करून त्यात दुधी टाका व मंद आचेवर शिजवा.
नंतर त्यात साखर, वेलची पूड, थोडेसे तूप व हवे असल्यास हिरवा रंग घाला.
मिश्रण घट्ट होत आले की त्यात काजू, बदाम, मनुके मिसळा.
पाणी पूर्ण आटल्यावर ताटात काढा आणि थंड झाल्यावर चौकोनी तुकडे करा.

२) बीटाची बर्फी
बीट उकडून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बीटाची पेस्ट टाका.
थोडे पाणी आटल्यावर त्यात कॉर्नफ्लोअरचा पातळ घोळ घाला.
त्यात साखर, किसलेला नारळ व सुकेमेवे टाका आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
हे मिश्रण तुपाने लावलेल्या ताटात पसरवा. थंड झाल्यावर चौकोनी तुकड्यांत कापा.

३) भोपळ्याची बर्फी
भोपळा सोलून किसून घ्या.
कढईत तूप गरम करून त्यात भोपळा टाकून पाणी पूर्ण आटेपर्यंत परता.
दुसरीकडे साखरेची चाशनी तयार ठेवा.
भोपळ्यामधे दूध घालून घट्ट होईपर्यंत शिजवा.
त्यानंतर त्यात चाशनी घालून पुन्हा एकदा शिजवा.
तुपाने लावलेल्या ताटात हे मिश्रण पसरवा. थंड झाल्यावर मनासारख्या आकारात कापा आणि वर सुकेमेवा टाकून सजवा.

थोडक्यात सांगायचं झालं तर, या गणेशोत्सवात पारंपरिक मोदक आणि लाडवांसोबतच या भाज्यांच्या बर्फ्या बाप्पाला अर्पण करा. घरच्या मंडळींनाही वेगळा स्वाद अनुभवायला मिळेल आणि सणाची गोडीही अधिक वाढेल.





