गाडेला VC द्वारे न्यायालयात हजर; न्यायाधिशांनी विचारल: पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? नराधम म्हणाला…

Swargate rape case | स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची २६ मार्च रोजी न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असून न्यायालयाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे गाडेचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. गाडेला पोलिसांनी गुनाट गावातील अटक केल्यानंतर त्याच्या विरोधात स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर आता पुन्हा त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ही मुदत आता आठ एप्रिलपर्यंत असणार आहे. गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी बुधवारी दिले आहेत.
आरोपी गाडेला येरवडा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी गाडेला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. त्यावर कोणतीही तक्रार नसल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाच्या परवानगीने बचाव पक्षाचे ॲड. वाजेद खान-बिडकर यांनी आरोपी गाडेला कारागृहात येऊन भेटून खटल्याबाबत सूचना घेणार असल्याचे सांगितले. यावेळी पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले उपस्थित होत्या. आता गाडेचा मुक्का येरवडा कारागृहातच असणार आहे. आरोपीविरोधात येत्या आठड्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहेत.
या प्रकरणात डीएनए चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. येत्या आठवड्यात अहवाल पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अद्यापर्यंत पोलिसांना गाडेचा मोबाईचाही शोध लागलेला नाही. यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की आरोपीच्या मोबाइलचा या गुन्ह्याच्या तपासावर किंवा पुराव्यांवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मोबाइल सापडला नसला तरीही फार फरक पडत नाही.





