पुणे | टेमघर धरण दुरुस्तीसाठी अखेर निधी मिळणार

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण दुरुस्तीचे काम निधीअभावी मागील दोन – अडीच वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. धरणातून होणाऱ्या पाणीगळतीच्या अनुषंगाने ग्राउटींग आणि इतर उपाययोजना करण्याचे आदेश देत यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली आहे. यामुळे धरण दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. या धरणाची क्षमता सुमारे चार टीएससी इतकी आहे. अवघ्या 15 वर्षांतच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. यानंतर धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठा असताना दुरुस्ती शक्य नसल्याने धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येते. त्यानंतरच दुरुस्ती केली जाते.
दरम्यान, ही दुरुस्तीचे काम 2017 मध्ये हाती घेण्यात आले. या कामांमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग व ग्राऊटिंग या पद्धतीने धरण दुरुस्तीचे काम करण्यात आले. धरण दुरुस्तीचे हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले आहे.
करोनाची दोन वर्ष आणि त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीस जलसंपदा विभागाची सुधारीत प्रकल्प मान्यता न मिळाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही. टेमघर धरणाची उंची 86 मीटर, तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे.
आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 30 टक्के दुरूस्तीला जलसंपदा विभागाची सुधारित प्रकल्प मान्यता आवश्यक आहे. ही मान्यता रखडल्याने दुरुस्तीचे काम थांबले होते. आता निधी देण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याने धरण दुरुस्तीचे काम सुरु होऊन गळती रोखली जाऊ शकते.




