पुणे | अत्याचार प्रकरणातील फरार पोलीस शिपाई अटकेत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अत्याचार प्रकरणात फरार असलेल्या पोलीस शिपायाला खडक पोलिसांनी अटक केली. उच्च न्यायालायाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. दीपक सीताराम माेधे असे या शिपायाचे नाव आहे. तो खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता.
करोना काळात त्याने एका महिलेला घरी स्वयंपाकासाठी बोलावले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने मोबाइलवर चित्रफीत तयार केली. त्यानंतर चित्रफीत प्रसारित करण्याची, तसेच महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.
महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवून मोधेने तिच्याकडून सहा तोळ्यांचे दागिने, लॅपटाॅप, मोबाइल घेतला. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फरार झाल्यानंतर त्याने जामीन मिळवण्यासाठी सत्र आणि उच्च न्यायालायात अर्ज केला होता. पण, उच्च न्यायाालयाने जामीन फेटाळत त्याला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने मोधेला शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक वैशाली तोटेवार, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी ही कारवाई केली.





