Pune : मोक्कातील फरार चुहा गॅंगचा प्रमुख गजाआड ! अल्पवयीन मुलांचा टोळीत समावेश करुन करायचा गुन्हे

पुणे – मोक्याच्या गुन्हयात जामीनावर सुटल्यावर सहा महिण्यांपासून फरार असलेला चुहा गॅंगचा प्रमुख भारती विद्यापीठ पोलिसांच्या हाती लागला आहे. फरार झाल्यापासून तो वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये स्वत:ची ओळख लपवून रहात होता. अल्पवयीन मुलांचा टोळीत समावेश करुन त्याने कात्रज भागात दहशत माजवली होती. यामुळे त्याला मोक्का लावण्यात आला होता.
साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान ( 23, रा लुनिया बिल्डींग, संतोषनगर, कात्रज ) असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसा साकीब चौधरीची टोळी कात्रज परिसरात चुहा गॅंग म्हणून प्रसिध्द होती. त्यांनी केलेल्या गुन्हयांमुळे टोळीला मोक्का लावण्यात आला होता. मोक्काच्या गुन्हयात तो जामिनावर बाहेर आल्यावर त्याने एक खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा केला. यानंतर तो फरार झाला. तो मागील काही महिणे पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याच्या मागावर काही पथके होती. मात्र तो हाती लागत नव्हता.
दरम्यान तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वारंवार बाहेरील जिल्हयातील खबऱ्यांचे नेटवर्क सक्रीय केले. पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपी साकीब पुरंदर तालूक्यात येथे राहत असल्याची खबर मिळाली. पथकाने छापा टाकून निरा येथून त्यास ताब्यात घेतले.
जामिनावर सुटल्यावर पुन्हा बनवली टोळी
साकीबने मोक्क्यातून जामीन मिळाल्यावर पुन्हा स्वत:ची टोळी बनवली होती. यासाठी त्याने कात्रज परिसरातील शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांचा टोळीत समावेश केला होता. या टोळीने पुन्हा एकदा दहशत माजवण्यास सुरवात केली होती. त्यांनी फेब्रुवारी महिण्यात एकावर जीवघेणा हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.





