सर्पमित्रांना ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा, 10 लाखांचा विमा; मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस

मुंबई : नागरिकांच्या मदतीसाठी जीव धोक्यात घालून साप पकडणाऱ्या सर्पमित्रांना आता ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत शिफारस केली असून, सर्पमित्रांना 10 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि अधिकृत ओळखपत्र देण्याची तयारी आहे.
ग्रामीण आणि शहरी भागात साप आढळल्यास सर्पमित्र तातडीने घटनास्थळी पोहोचतात. विषारी किंवा बिनविषारी साप पकडून ते त्यांना निसर्गात सोडतात, ज्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होते. मात्र, सर्पदंशामुळे काही सर्पमित्रांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा जोखमीच्या कामासाठी सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’चा दर्जा देण्याचा सरकारचा विचार आहे.
मंत्री बावनकुळे म्हणाले, “सर्पमित्र मानव-वन्यजीव संघर्ष कमी करतात. त्यांच्या कामाला मान्यता देण्यासाठी ओळखपत्र आणि विमा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.” सध्या सर्पमित्रांची संख्या वाढत असली तरी प्रशिक्षित सर्पमित्रांची कमतरता जाणवते.
काहीवेळा अप्रशिक्षितपणामुळे दुखापतीही होतात. पूर्वी गारुडी आणि नागवाला बाबांची परंपरा होती, ती आता लोप पावली आहे. आज सर्पमित्र हीच गरज बनली आहे. मात्र, काहीजण या कामाला प्रसिद्धीसाठी वापरतात, असेही दिसते. प्रशिक्षण आणि सराव यावर भर देण्याची गरज आहे. सरकारच्या या पुढाकारामुळे सर्पमित्रांचे योगदान अधिकृतपणे मान्य होईल, अशी अपेक्षा आहे.





