अग्रलेख : नाते अविश्वासाचे

हनीमूनसाठी इंदूरपासून 2200 किमी अंतरावरील मेघालय येथे गेलेल्या राजा रघुवंशी याची हत्या झाली. या खळबळजनक घटनेमुळे तेथील पोलीस यंत्रणा टीकेचा सामना करत असताना धक्कादायक वळण या प्रकरणाला मिळाले. राजाची पत्नी सोनम हीच या हत्या प्रकरणाची सूत्रधार असल्याचा आरोप आहे. 11 मे रोजी राजा आणि सोनमचे लग्न झाले होते. त्याच्या साधारण दोन आठवडे अगादेर त्यांचे लग्न ठरले होते. या मधल्या काळातच सोनमने हत्येची योजना आखली व यात तिच्या कथित प्रियकराला सहभागी करून घेतले.
ही घटना खळबळजनक आहे, मात्र पहिलीच नाही. गेल्या काही महिन्यांत प्रेयसीने प्रियकराला संपवल्याच्या अथवा पत्नीने पतीला संपवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत आहेत. संबंधांत विश्वासाचा अभाव आणि कृतघ्नतेचा कळस गाठणारी विकृती दर्शवणार्या या घटना समाज माध्यमांवर विनोदी स्वरूपात सादर केल्या जात आहेत. अॅरेंज मॅरेज केले तरी पुरुषाचा पत्नीकडून घात होतो आणि प्रेम विवाह केला तरी घातच होतो असे त्यातून सूचित करायचे आहे.
कशाचा विनोद करायचा हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग असतो. तथापि, या सर्व प्रकरणातून एक बाब निश्चित झाली आहे की समाजात विश्वास आणि संबंधांतील सामंजस्याला एवढा तडा गेला आहे की हे पतन पाहून हादरायला होते. हत्यांच्या या घटनांमुळे आणखी एका नव्या चर्चेलाही सुरुवात झाली आहे. या चर्चेचा प्रवास काही जणांनी अनेक शतके मागेपर्यंत नेला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की महिलांना जेव्हा चूल आणि मूल एवढेच मर्यादित ठेवले होते तोपर्यंत बरे होते.
त्यांना कथित स्वातंत्र्य दिले गेल्यामुळेच आज असले गुन्हे होऊ लागले आहेत. महिलांची कार्यालय अथवा अन्यत्र प्रेमप्रकरणे, त्याकरता पतीचीच फसवणूक आणि या प्रकारांत मुलांचा अडसर होत असल्यामुळे आपल्याच मुलांची हत्या करणे आदी प्रकारही महिला करत आहेत. हे त्यांना मोकळे सोडल्यामुळे झाल्याचा दावा त्या चर्चांमधील काही जण करत आहेत. अर्थात, हा चुकीचा आणि उलट दिशेने जाणारा प्रवास आहे. जर तुम्ही दोन-चार घटनांवरून काळीच बाजू पाहण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे समर्थन करता येत नाही. गुन्हेगारी घटनांची नोंद ठेवणार्या एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार होणार्या एकूण गुन्ह्यांत 90 ते 92 टक्के गुन्हे पुरूष करतात. महिलांचा गुन्ह्यांत सहभाग असण्याचे प्रमाण 6 ते 8 टक्के आहे.
आकडेवारीत सगळे काही स्पष्ट होते. पण येथे प्रश्न पुरूष आणि महिला असा नाहीच आहे. तो आहे गुन्ह्यांचा आणि गुन्हे थांबले पाहिजेत याचा. सराईत गुन्हेगार, इर्षा-स्पर्धा-द्वेष किंवा अन्य काही कारणांमुळे गुन्हेगारीकडे वळणे आणि त्यातून अघोरी कृत्य करणे हा भाग वेगळा. समाजाची मान्यता लाभलेल्या किंवा समाजाची रचनाच ज्या नात्याच्या पायावर आधारलेली आहे त्या पती-पत्नीच्या नात्यात परस्परांविरूद्ध केले जाणारे गुन्हे वेगळे. अगोदर फरक समजून घेतला पाहिजे. राजा आणि सोनमचे प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रात एक आणि अन्यत्र एक अशा दोन घटना गेल्या काही तासांत घडल्या.
यातील महाराष्ट्रातील घटनेत 27 वर्षीय पत्नीने डोक्यात कुर्हाड घालून 45 वर्षीय पतीची हत्या केली. एका घटनेत कलिंगडामध्ये विष मिसळून पत्नीने पतीला ठार केल्याचीही बातमी आहे. हे सगळे गुन्हेच आहेत. पुरूष-महिला समानता वगैरे निकष त्याला लावले जाऊ नये. तसेच एखाद्या महिलेने गुन्हा केला म्हणून त्याचे गांभीर्य सौम्यही होता कामा नये. एकीकडे महिला सशक्त होत आहेत असे म्हटले जाते. त्याचवेळी गुन्ह्यात तिच्या सहभागाची पुष्टी झाली तर महिला असे करू शकत नाही असे म्हणण्यालाही काही अर्थ नसतो. गुन्हा करणारी प्रत्येक व्यक्ती थेट अविचाराने कृत्य करत नसते.
एखाद्याला अथवा एखादीला संपवण्याचा विचार हा अविचार असतोच, मात्र त्या निर्णयाप्रत कोणी अचानक येत नसतो. त्यामागे एक विचारचक्र अगोदरपासूनच सक्रिय झालेले असते. आपल्यावर अन्याय झाला, आपल्याला हे नको ते हवे आहे, आपल्या इच्छेविरूद्ध हे सगळे घडते आहे, मला सूड घ्यायचा आहे अशी अनेक कारणे त्यामागे असतात आणि त्यानुसार गुन्हा केला जातो. वर म्हटल्याप्रमाणे पती-पत्नीचे नाते यात बसत नव्हते. विवाहांमध्ये सामान्यत: हुंडा अथवा अन्य कारणांनी महिलांवरच अन्याय झाला आहे. पतीच्या बाहेरख्याली पणाची किंवा मूल होत नसल्यामुळे किंवा मुलीच होत असल्यामुळे महिलेला प्रसंगी मृत्यूला कवटाळावे लागले आहे.
अशा असंख्य घटना घडल्या आहेत. त्या सातत्याने ऐकल्या आणि पाहिल्या गेल्यामुळे त्याचे गांभीर्य बहुदा कमी झाले. मात्र महिलांनी त्यांच्या हेतूपुूर्तीसाठी पतीची हत्या करण्याचा प्रकार जो समोर येतो आहे त्याचा पूर्वी कधी विचारच केला नव्हता म्हणून हादरवतो आहे. इच्छेविरूद्ध लादले जाणे आणि संबंधांत असलेला विश्वासाचा अभाव हेच याचे कारण आहे. कुटुंबातील एक सदस्यच दुसर्या सदस्यावर विश्वास ठेवत नसेल तर जगात कोणीच कोणावर विश्वास ठेवू शकणार नाही.
विवाह संस्थाच आता ठिसूळ झाली असे म्हणून हा प्रश्न निकालीही काढता येणार नाही कारण ही संस्था बाद केली जाऊ शकत नाही आणि होऊही शकत नाही. त्यावर तोडगा म्हणून ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ आदी उपाय केले गेले तरी शेवटी त्या रिलेशनलाही तेच स्वरूप अखेर प्राप्त होत असते जे विवाहातील संबंधांना असते. या सगळ्यावर विश्वासाचे नाते दृढ करणे आणि संयमाने प्रत्येक गोष्टीचा सामना करणे हाच उपाय असू शकतो. दुर्दैवाने तेच लोप पावत आहे.





