अग्रलेख : बोगस डॉक्टर-औषधे

राजस्थानच्या सिकरमध्ये सरकारी रूग्णालयातून मिळालेले कफ सिरप घेतल्यामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातही महिनाभरात 9 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यूही कफ सिरप घेतल्यामुळेच झाल्याचा दावा करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार सिरप घेतल्यामुळे मुलांची किडनी फेल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील जिल्हाधिकार्यांनी दोन औषधांवर बंदी जाहीर केली आहे. तसेच एका फार्मास्युटिकल्स कंपनीवर छापेमारी केली आहे. अचानक आणि अत्यंत वेगाने या घटना घडल्यामुळे खळबळ निर्माण झाली. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांतील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून काय समोर यायचे ते येईलच;
तथापि, गेल्या काही काळापासून औषधांचा आणि बोगस डॉक्टरांचा, ज्यांना झोलाछाप डॉक्टरही म्हटले जाते त्यांचा विषय अत्यंत गंभीरपणे समोर येतो आहे. रूग्णाच्या आयुष्याशी हा विषय निगडीत असल्यामुळे केवळ राज्यांपुरतीच नाही तर केंद्रीय पातळीवर धडक मोहीम आणि धोरणाची आखणी करून हा धोका पूर्णत: नष्ट करणे आवश्यक असताना त्याकडे अद्याप म्हणावे तसे लक्षच दिले गेले नसल्याचे खेदाने म्हणावे लागते आहे. राजस्थानच्या भरतपूरमधील घटना धक्कादायक आहे. मुलाला सर्दी आणि खोकला असल्यामुळे सरकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी औषधांसोबतच कफ सिरपही लिहून दिले. घरी आल्यावर मुलाच्या पालकांनी त्याला सिरप दिले. नंतर चार तास झाल्यावरही मुलाची काहीच हालचाल न दिसल्यामुळे पालक घाबरले आणि त्याला रूग्णालयात घेऊन गेले. मुलाला दाखल करून घेण्यात आले आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशात मुलांची किडनी निकामी होत असल्याचे आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासन हादरले आणि सर्व मुलांवर देखरेख ठेवली जात आहे. ज्या कंपनीवर छापा टाकण्यात आला त्यांनी चेन्नई येथून औषधे मागवली होती. त्यातील 90 टक्के औषधे त्यांनी एकट्या छिंदवाडा येथे पाठवली होती. येथील आजारी मुलांवर आता नागपूरमध्ये उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, बोगस डॉक्टरांकडून ही औषधे दिली गेलीत का याची आता चौकशी केली जाते आहे. दोन राज्यातील घटना सारख्या असल्या तरी त्यातही थोडा फरक आहे. राजस्थानात जे औषध दिले गेले ते तेथील सरकारी रूग्णालयातून मोफत दिले गेले आहे. तर मध्य प्रदेशातील काही प्रकरणात जे औषध दिले गेले ते मुळात लहान मुलांना देण्यास मनाई असलेले औषध आहे. थोडक्यात औषध आणि डॉक्टर या दोन्ही स्तरावर घोळ झाला असून त्यात काही निरागस चिमुरड्यांना त्यांचा काहीही दोष नसताना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात राजस्थानात काही जिल्ह्यांत बोगस डॉक्टरांवर छापे टाकण्यात आले होते.
त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याच्या बातम्या होत्या व त्याचवेळी असेही आढळून आले होते की बरेच बोगस डॉक्टर अनेक वर्षांपासून प्रॅक्टीस करत होते. जर अनेक वर्षे हा प्रकार राजरोस सुरू होता तर आपली यंत्रणा ढिसाळ आहे की सर्रास बोगसगिरी करणारे हे भोंदू इतके निर्ढावले आहेत की त्यांना आपण किती गंभीर गुन्हा करतो आहेत याची कल्पना असूनही त्याची भीती वाटत नव्हती? 2022 मध्ये एका प्रख्यात उद्योगपतीने एका कार्यक्रमात या धोक्याची कल्पना सरकारला दिली होती. भारतातील एका सिरपमुळे आफ्रिकेतील एका देशात 69 लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या बातमीकडे त्यांनी लक्ष वेधले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतीय औषधाबाबत अलर्ट जारी केला होता. ज्या उद्योगपतीने असल्या प्रकारांमुळे जगात भारताची प्रतिमा खराब होते, देशाची नाचक्की होते हे चांगलेपणाने सांगण्याचा प्रयत्न केला त्यालाच घेरण्याचा अघोरी प्रकार समाजमाध्यमातून आणि अन्यत्रही पाहायला मिळाला.
अनेक बोगस डॉक्टर कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेता डॉक्टर असल्याचा बनाव करत आहेत. त्यांच्या चुकीच्या उपचारांमुळे रूग्णाच्या जीवालाच धोका निर्माण होतो. लोकांना मग ते ग्रामीण भागातील असोत वा शहरी भागातील वैद्यकीय बाबतीत ज्ञान नसतेच व त्याही पलीकडे डॉक्टर या व्यक्तीवर श्रद्धा असल्यामुळे ते शंका कुशंका उपस्थित करत नाहीत. महाराष्ट्रातही मुंबई, नागपूर अशा भागांत अलीकडच्या काळात बोगस व्यक्तींवर कारवाई झाली आहे. पण काही दिवसांनंतर पुन्हा नव्या ठिकाणी ही मंडळी आपला तंबू गाडून बस्तान बसवतात. बनावट औषधांचा व्यवसायही मांडला गेला आहे. राजधानी दिल्लीतच काही महिन्यांपूर्वी एक रॅकेट पकडले गेले होते. त्यात सरकारी रूग्णालयांमधील लोकांशी संगनमत करून हा काळा व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले होते.
कर्करोगाशी संबंधित जी औषधे होती त्यात कोणतेही सक्रिय घटक नसल्याचे व नुसतेच पाणी किंवा तत्सम पदार्थ खरे वाटावे असे लेबल लावून बाटल्यांमधून विकले जात होते. काही औषधांवर क्युआर कोड असतो. तो स्कॅन करून औषधाची सत्यता तपासता येते; पण हे किती लोकांना कळते किंवा औषधे घेताना प्रत्येक वेळी विकत घेणार्याचे चित्त शांत असेलच असे नाही. प्रत्येक गोष्टीला मज्जाव करण्यासाठी कायदे असतात. त्यातून कधी पळवाटा काढल्या जातात. मग कायद्यातील तरतुदी अधिक कठोर केल्या जातात. हे सगळे करायलाच हवे आहे. मात्र मुळात नियमितपणे बोगस डॉक्टर आणि बोगस औषधांची तपासणी करणे आवश्यक झाले आहे. औषधांच्या संदर्भात जो प्रोटोकॉल आहे त्याचेही पालन व्हायला हवे. केवळ डॉक्टरांनीच नाही तर प्रत्येकाने सतर्क राहण्याची नितांत आवश्यकता आहे.





