अग्रलेख : ‘तेजस्वी’ चेहरा

2025 च्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त चर्चा होणार्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा अद्याप झाली नसली, तरी वातावरण मात्र चांगलेच गरम झाले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सर्व 243 जागांवर राष्ट्रीय जनता दल निवडणूक लढवू शकतो अशी घोषणा केल्यामुळे बहुचर्चित महागठबंधनच्या अस्तित्वाबाबत काही शंका निर्माण होत आहेत. अर्थात, बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका महत्त्वाच्या राजकीय सभेमध्ये बोलताना तेजस्वी यादव यांनी ज्या प्रकारे सर्व 243 जागांवर तेजस्वी यादव उभा आहे, असे गृहीत धरूनच मतदारांनी पाठिंबा द्यावा असे वक्तव्य केले, त्याला एक वेगळा अर्थही आहे.
राष्ट्रीय जनता दलाला सर्व 243 जागा लढायच्या आहेत हा त्याचा वरवरचा अर्थ असला, तरी महागठबंधनच्या राजकारणामध्ये उमेदवार कोणीही असला तरी माझा चेहरा समोर ठेवूनच सर्व मतदारसंघांमध्ये मतदान करावे, असे अप्रत्यक्षपणे तेजस्वी यादव यांनी मतदारांना सुचित केले आहे. बिहारमधील गेल्या पंधरा वर्षांच्या राजकारणामध्ये तेजस्वी यादव यांचा राजकीय प्रभाव वाढत चालला आहे हे नाकारण्याचे कारण नाही. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा खरा राजकीय वारसा सांभाळणार्या तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षालाही चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली.
त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाने चांगली कामगिरीही आतापर्यंत केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 143 जागा लढवून राष्ट्रीय जनता दराने 75 म्हणजे सर्वात जास्त जिंकल्या होत्या. तेजस्वी यादव यांच्या चेहर्याची आणि त्यांच्या शैलीची बिहारमध्ये क्रेझ आहे हे नाकारता येत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर नेते ज्या प्रकारे बिहारमध्ये कॅम्पेनिंग करत आहेत ते पाहता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांची घोषणा त्यांना मान्य असेल का, हेसुद्धा पहावे लागेल. बिहारमधील काँग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, काँग्रेसने निवडणूक आयोगाला लक्ष्य करून मतचोरीचा जो विषय समोर आणला आणि बिहारमध्ये ज्या विविध प्रकारच्या रॅली काढल्या त्यामुळे सरकार विरोधी वातावरण तयार झाले आहे.
महागठबंधनमध्ये काँग्रेसचा सुद्धा वाटा महत्त्वाचा असावा अशी बिहारमधील काँग्रेस नेत्यांचीही अपेक्षा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने फक्त 70 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला होता. बिहारमध्ये काँग्रेसचा तेथील स्थानिक नेता राज्याचा चेहरा म्हणून समोर येत नसला तरी राहुल गांधी यांचा चेहरा या निवडणुकीसाठी वापरण्याचे धोरण काँग्रेसने पत्करले आहे. गेल्या आठवड्यात बिहारमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते.
याच पार्श्वभूमीवर आता तेजस्वी यादव यांनी आपल्या ताज्या राजकीय सभेमध्ये बिहारमध्ये सर्व जागांवर तेजस्वी यादवच उभे आहेत असे गृहीत धरून मतदान करा, हे जे आवाहन केले आहे त्याचा अर्थ मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मीच आहे हे गृहीत धरा हाच होऊ शकतो. बिहारमध्ये प्रादेशिक पातळीवर इतर कोणताही नेता सध्या तेजस्वी यादव यांच्या एवढा लोकप्रिय किंवा चर्चेत नसल्यामुळे महागठबंधनच्या घटक पक्षांना तेजस्वी यादव यांचे नेतृत्व मान्य होण्यासही हरकत नाही. यानिमित्ताने महागठबंधनमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवतो हा विषयसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या वेळेपेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाव्यात अशी अपेक्षा काँग्रेसने आधीच व्यक्त केली आहे. पण गेल्या वेळेपेक्षा कमी जागा घेण्यास राष्ट्रीय जनता दलालाही इच्छा नाही.
महागठबंधनमधील सर्वच पक्ष नितीशकुमार यांना विरोध करण्यासाठी एकत्र आले असल्यामुळे जागा वाटपाबाबत वादविवाद जरी झाले तरी एखाद्या तोडग्यापर्यंत पोहोचून ही आघाडी नितीशकुमार यांना आव्हान देण्यासाठी मैदानात उतरेल हे निश्चित आहे. या आघाडीचा चेहरा म्हणून तेजस्वी यादवच समोर येत आहेत हे वास्तवही या निमित्ताने नाकारता येत नाही. तेजस्वी यादव यांनी आतापर्यंत दोनवेळा बिहारचे उपमुख्यमंत्रिपद भूषवले असल्यामुळे आणि बिहारमधील तरुण मतदारांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असल्यामुळे यावेळी निश्चितच तेजस्वी यादव यांचा चेहरा मतदारांना नितीशकुमार यांच्या सत्ताधारी चेहर्यापेक्षा जास्त आश्वासक वाटला, तर बिहारची ही निवडणूक निश्चितच रंगतदार होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मतचोरीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केली असली, तरी जागावाटपाच्या चर्चेमध्ये काँग्रेसला नेहमीसारखीच तडजोड करावी लागेल असे दिसते. तेजस्वी यादव यांनी नव्याने केलेल्या नेतृत्वाच्या या विधानावरून काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांची काय भूमिका आहे हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी तेजस्वी यादव यांच्या कामाचा धडाका आणि त्यांना वाढत चाललेला पाठिंबा पाहता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांनाच प्रोजेक्ट करावे लागेल हे गृहीत आहे.





