Top 10 News : तुकाराम मुंढेंची ‘धास्ती’ ते भीषण हेलिकॉप्टर अपघात..; वाचा आजच्या १० टॉप बातम्या
Top 10 News : Top 10 News : तुकाराम मुंढेंची 'धास्ती' ते भीषण हेलिकॉप्टर अपघात..; वाचा आजच्या १० टॉप बातम्या

Top 10 News : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली
राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत होणार असल्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर निश्चित झाले आहे. तब्बल तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पावसाळी परिस्थिती, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्था असे अनेक महत्त्वाचे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. सरकारने जाहीर केलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीतील अटींवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने या मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची रणनीती असणार आहे.
२) तुकाराम मुंढेंची ‘धास्ती’! तपासणीच्या अफवेनेच बाजारपेठ बंद; दुकानदारांनी ठोकले कुलूप
बुलढाणा : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची राज्यभर मोठी धास्ती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सोशल मीडियावर ‘एफडीएचे साहेब तपासणीसाठी येणार’ अशी अफवा पसरताच काही मिनिटांत संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. किराणा दुकाने, मिठाईची दुकाने, हॉटेल्स, पानटपऱ्या तसेच गुटखा-पानमसाला विक्रेत्यांनी तातडीने दुकाने बंद केली. ग्रामीण भागातही FDA च्या कारवायांचा धाक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, परळी येथे कारवाई होणार असल्याच्या चर्चेनंतर बीडमधील अनेक पानटपऱ्यांनीही आधीच कुलूप ठोकल्याची माहिती समोर आली आहे. (Top 10 News )
३) शेतकऱ्याचे हातपाय बांधले आणि पाजले विष; विदर्भातील संतापजनक घटना
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विहिगाव शिवारात शेतात काम करत असलेल्या दादाराव भगाजी अभ्यंकर (67) यांचे हातपाय बांधून जबरदस्तीने विष पाजण्यात आले. त्यांच्यावर सध्या अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलगा मिलिंद अभ्यंकर यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी निखिल गणेशे व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय आहे. यापूर्वी मारहाणीच्या तक्रारीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. (Top 10 News )
४) अंधश्रद्धेच्या नावाखाली 51 हजारांची फसवणूक! शिर्डीत आणखी एका ‘अशोक खरात’चा पर्दाफाश
अहमदनगर : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर आता शिर्डीतही अशाच नावाच्या आणखी एका भोंदूचा पर्दाफाश झाला आहे. आंतरजातीय विवाहात अडथळे येतील, करणी झाली आहे असे सांगून एका दाम्पत्याकडून पूजा-विधीच्या नावाखाली 51 हजार रुपये उकळल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची साथीदार माया कुसळकर यांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. अमावास्येच्या दिवशी विशेष पूजेसाठी दाम्पत्याला बोलावण्यात आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी किती जणांची फसवणूक झाली याचा तपास सुरू आहे. (Top 10 News)
५) कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंना मारहाण,
जयपूर : सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने चर्चेत आलेले अभिजीत दिपके यांना जयपूरमधील आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिपके यांनी सुरू केलेल्या सोशल मीडिया अकाउंटला अवघ्या चार दिवसांत 10 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने ते चर्चेत आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली असून, हिंगोलीतील त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा तैनात केली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. (Top 10 News)
६) तृणमूलचा 20 खासदारांचा बंडखोर गट नव्या पक्षात विलीन; NDA ला पाठिंबा
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील 20 बंडखोर खासदारांनी त्रिपुरातील ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’मध्ये विलीन होण्याची घोषणा केली असून, एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाला मान्यता आणि सभागृहात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. दरम्यान, तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाची बाजू ऐकूनच निर्णय घ्यावा, अशी विनंती अध्यक्षांकडे केली होती. बंडखोर गटाने पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांचे संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Top 10 News)
७) ब्राझीलमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात! हवेतच दोन हेलिकॉप्टरची धडक; गायकासह 6 जणांचा मृत्यू
ब्राझील : ब्राझीलमधील रिओ डी जनेरियोच्या पश्चिम भागात दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. या अपघातात प्रसिद्ध गायकासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्करी अग्निशमन दलाने दिली. धडक झाल्यानंतर एका हेलिकॉप्टरने कार शोरूमवर कोसळल्याने तेथील अनेक इलेक्ट्रिक वाहनांना आग लागली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर Airbus H125 आणि Bell 206B JetRanger मॉडेलची होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 8:59 वाजता हा अपघात झाला. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे. (Top 10 News)
८) स्मार्टफोन महागले! Vivo च्या 4 मॉडेल्सच्या किमतीत 4,000 रुपयांची वाढ
मुंबई : स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. Vivo ने आपल्या V70, V70 Elite, Y400 आणि Y21 या चार स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे. विविध स्टोरेज व्हेरियंटनुसार 1,000 ते 4,000 रुपयापर्यंत किंमत वाढवण्यात आली आहे. वाढत्या उत्पादन खर्च आणि मेमरी घटकांच्या जागतिक तुटवड्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती टिप्स्टर संजू चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे. विशेष म्हणजे, या किंमतवाढीचा सर्वाधिक परिणाम मिड-रेंज आणि प्रीमियम स्मार्टफोन खरेदीदारांवर होणार असून, बजेट श्रेणीतील बहुतांश मॉडेल्सच्या किमती सध्या कायम आहेत. (Top 10 News)
०९) ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री संचिता उगलेचे निधन; राहत्या घरी मृतावस्थेत आढळली
मुंबई : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘छावा’ चित्रपटातून ओळख मिळवलेल्या अभिनेत्री संचिता उगले (वय 30) यांचे निधन झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्या मुंबईजवळील नालासोपारा परिसरातील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थितीचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अकाली निधनाने चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. (Top 10 News)
१०) भारत-पाक महिला सामन्यात तुंबळ हाणामारी?
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केल्यानंतर सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला. यात दोन्ही देशांच्या महिला खेळाडू मैदानावर एकमेकांवर हात उचलताना आणि अंपायर मध्यस्थी करताना दिसत आहेत. अवघ्या १० तासांत हा व्हिडिओ १० लाख लोकांनी पाहिला. मात्र, तपासाअंती हे धक्कादायक सत्य समोर आले की हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट (Fake) असून तो ‘AI’ द्वारे तयार केला आहे. व्हिडिओमध्ये खेळपट्टीवर भारताचे ३ फलंदाज दाखवले आहेत आणि जर्सीवरील नावेही उलटी आहेत. मैदानावर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. (Top 10 News)




