Budget 2025: सर्वात मोठे ते सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण…जाणून घ्या कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे विक्रम

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यांचा हा विक्रमी आठवा अर्थसंकल्प असेल. तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य या अर्थसंकल्पातील घोषणांकडे डोळे लावून बसले आहेत.
आतापर्यंत अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. काहींची भाषणे, घोषणा विशेष गाजल्या. ब्लॅक बजेट, रोलबॅक बजेट अशी नावे देखील अर्थसंकल्पांना पडली. याशिवाय, सर्वाधिक वेळ अर्थसंकल्पीय भाषण सादर करण्याचा विक्रम देखील अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे.
सर्वात मोठे व सर्वात लहान अर्थसंकल्पाचे भाषण कोणी केले तुम्हाला माहितीये का? याविषयी जाणून घेऊयात.
सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण
सर्वाधिक वेळ अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावरच आहे. त्यांनी 2019 मध्ये 2 तास 17 मिनिटांचे भाषण दिले होते. मात्र, पुढच्याच वर्षी त्यांनी हा विक्रम मोडला. 2020 मध्ये त्यांनी तब्बल 2 तास 42 मिनिटे भाषण केले. आजपर्यंतचे हे इतिहासातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण मानले जाते.
त्यापाठोपाठ 2003 मध्ये जसवंत सिंग यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते. तर अरुण जेटली यांनी 2014 मध्ये 128 मिनिटं भाषण केले होते. शब्दांच्या बाबतीत सर्वात मोठे भाषण देण्याचा विक्रम 1991 ला तत्कालिन अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या नावावर आहे. त्यांनी 18700 शब्दांचे भाषण दिले होते.
सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण
1977-78 मध्ये अर्थमंत्री हिरुभाई पटेल यांनी फक्त 800 शब्दांचे आतापर्यंतचे सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण दिले होते. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी हे भाषण दिले होते.





