Pune News : एफ.सी. रोडवर बॉम्ब ब्लास्टपासून एअरपोर्ट हायजॅकपर्यंत सराव

पुणे : शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी आज विविध ठिकाणी दणदणीत मॉक ड्रिल आयोजित केली. बॉम्ब ब्लास्ट, अतिरेकी हल्ला आणि विमान हायजॅक अशा गंभीर परिस्थितींना तोंड देण्यासाठी पोलिस दलाची तयारी किती सक्षम आहे, हे पाहण्यासाठी हा सराव करण्यात आला.
सकाळी दुपारी २ वाजता एफ.सी. रोड-डेक्कन पोलीस स्टेशन परिसरात आणि २.३० वाजता एम.जी. रोड, लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे गृहीत धरून कारवाई करण्यात आली. या ठिकाणी त्वरित नियंत्रण मिळवून पोलिसांनी परिस्थिती सुरक्षित केली.
यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत R & DE येथे अतिरेक्यांनी वरिष्ठ शास्त्रज्ञांना ओलीस धरून केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सराव राबवण्यात आला. निगोशिएशन टीमने ठिकाणी पोहोचून अतिरेक्यांसोबत चर्चा सुरू केली.
दरम्यान, सायंकाळी ६.४० वाजता विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे एअरपोर्टवर हायजॅक झालेल्या इंडिगो विमानाची आपत्कालीन लँडिंगची परिस्थिती निर्माण करण्यात आली. विमानातील प्रवाशांना ओलीस धरल्याचे गृहीत धरून पोलिसांची निगोशिएशन टीम विमानतळावर दाखल झाली.
या सर्व घटना पूर्णतः डमी असून, ही पोलिसांची मोठी Exercise Drill असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





