पुणे जिल्हा | १५ आँगस्टपासून,शहराचा पाणी पुरवठा नियमित सुरू करा

भोर, (प्रतिनिधी) – उन्हाळ्यात भाटघर धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्यानंतर भोर शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता. आता धरण्याच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण १०० टक्के भरले असल्याने शहराला १५ आॅगस्टपासून रोज नियमित पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी भोर नगरपालिकेच्या प्रशासनास दिल्या.
भोर नगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात मंगळवार (दि. ६) रोजी शहराच्या विकासाबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार, बांधकाम विभागाचे शाखाअभियंता अभिजित सोनावले, पाणी पुरवठा अधिकारी सागर कुऱ्र्हाडे,
आरोग्य विभागाचे महेंद्र बांदल, लेखा विभागाचे ज्ञानेश्वर मोहिते, नगरविकासाचे अधिकारी पवन भागणे, शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, राजेंद्र राऊत, संगिता बोरावळे, माजी गटनेते सचिन हर्णसकर, रामचंद्र आवारे, माजी नगरसेवक सुमंत शेटे, गणेश पवार, अमित सागळे, जगदिश किरवे, ठेकेदार नितीन ओव्हाळ, बाळासाहेब ठाकर, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते.
शहरातील मालमत्ता धारकाप्रमाणे नळ कनेक्सन नियमित करणे, तसेच बेकायदेशीर असणारे नळ कनेक्शन नियमित करून शासनाच्या नियमानुसार पाणी पट्टीची आकारणी करावी.
शहरातील असणारी लोकमान्य टिळक मार्केट, बाजार संकूल, स्विमिंग पूल, नाना-नानी पार्क, महात्मा फुले भाजी मंडईचे प्रशासकीय काळात ही विकास कामे संथ गतीने सुरू असून ती एक महिन्याच्या आत पूर्ण करावीत, असे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरात फाँगिंग मशिनद्वारे फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला आमदार संग्राम थोपटे यांनी दिल्या. शहरातील बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना ही या वेळी संबंधित विभागाला देण्यात आल्या.




