French Open Tournament : अल्कराझ, श्वीऑटेक दुसऱ्या फेरीत दाखल; ऐतिहासिक कामगिरीकडे कूच

मागच्या काही काळापासून संघर्ष करणारी इगा श्वीऑटेक आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे. चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी श्वीऑटेक गतविजेती आहे. विशेष म्हणजे सलग तीन वर्षे ती विजेती आहे. महिला एकेरीत आतापर्यंत कोणालाच 4 विजेतेपद पटकावता आलेले नाही. मोनिका सेलेस आणि जस्टिन हेनिन यांनी सलग तीन विजेतीपदे मिळविलेली आहेत. मात्र, सलग चौथ्या विजेतेपदापासून दोघीही वंचित राहिल्या. त्यामुळे इगा श्वीऑटेक हिच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ऐतिहासिक कामगिरीकडे कूच
ऐतिहासिक कामगिरीकडे कूच करताना श्वीऑटेकने पहिल्या फेरीचा अडथळा 1 तास 24 मिनिटांत पार केला. श्वीऑटेकने सेंटर कोर्टवर झालेल्या सामन्यात 42 व्या स्थानावरील रेबेका स्रामकोवाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. विशेष म्हणजे श्वीऑटेक 2024 मध्ये येथे विजेतेपद मिळविल्यापासून एकाही स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचलेली नाही. श्वीऑटेकची गाठ आता एमा रॅडुकानूशी पडणार आहे. रॅडुकानूने तीन सेटच्या लढतीत चीनच्या वँग शिन्यूचा पराभव केला आहे.
तर दुसरीकडे पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराझ यानेदेखील पहिला विजय मिळवला आहे. अल्कराझलाही विजयासाठी फार प्रयत्न करावे लागले नाहीत. त्याने पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या गिउलिओ झेपिएरीवर 6-3, 6-4, 6-2 असा विजय मिळवला आहे. या विजयासह त्याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
इतर निकाल
तर दुसरीकडे पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला डॅनिए अल्टमेअरकडून 5-7, 6-3, 3-6, 1-6 असा पराभव पत्करावा लागला. विसाव्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने टोमास मार्टिन एचेवेरीचे आव्हान 7-5, 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. सातव्या मानांकित कॅस्पर रुडने पहिला अडथळा पार करताना अल्बर्ट रामोस विनोलासवर 6-3, 6-4, 6-2 असा विजय मिळविला.
तर महिला एकेरीतील अन्य सामन्यात एलिना रायबाकिनाने ज्युलिया रिएराचे आव्हान 6-1, 4-6, 6-4 असे मोडून काढले. नवव्या मानांकित एमा नवारोला मात्र पहिल्या फेरीत जेसिका मॅनेइरोकडून 0-6,1-6 असा पराभव पत्करावा लागला.





