Narendra Modi : “जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किमी लांबीच्या आणि 20 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या राष्ट्रार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

Narendra Modi – पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.
यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून 250 पेक्षा अधिक ट्रकइतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल. ही बाब देशाच्या लॉजिस्टीक व्यवस्थेला एक नवी गती व दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किमी लांबीच्या आणि 20 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या राष्ट्रार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दरम्यान व्ही.सी.द्वारे डबल स्टेक मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून राष्ट्राला समर्पित केले.
उरण येथील जेएनपीए येथे आयोजित कार्यक्रमास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मोदी यांनी देशामध्ये 2014 नंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मिळालेल्या वेगाचा उल्लेख करताना पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे सांगितले. ही मार्गिका देशाच्या व्यापारी व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणत असून त्या राष्ट्रीय व्यापाराचा आधार बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘…देशातील पहिले बंदर ठरेल’ – मुख्यमंत्री
जेएनपीटीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे 55 टक्के कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल.
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान जेएनपीटीने सुमारे 38.27 लाख टीईयू कंटेनर हाताळले असून समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या वाहतुकीला आणखी गती मिळेल. येत्या 2030 पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.





