Pune : ‘जीबीएस’वर इंजेक्शन आणि उपचार मिळणार मोफत; महापालिकेच्या निर्णयाने पुणेकरांना दिलासा!

पुणेः गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. या आजाराच्या रुग्णांना आता इम्युनोग्लोब्यूलिन हे इंजेक्शन मोफत देण्यात येणार असून, खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना गरीब योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे. तसेच कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
जीबीएस या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने या आजारावर मोफत उपचार करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी जीबीएसवर कमला नेहरु रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार या आजारावर कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मोफत उपचार आणि इम्युनोग्लोब्यूलिन इंजेक्शन दिले जाणार आहे. तर खाजगी रुग्णालयात जीबीएसवर शहरी गरीब योजनेअंतर्गत दोन लाखपर्यंतच्या उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे, या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
दूषित पाण्यामुळे आजाराला आमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जीबीएसची रुग्णसंख्या तब्बल १११ वर जाऊन पोहचली असून, या आजाराने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. दिवसागणिक या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णापैकी काही रुग्ण हे व्हेटिलेटरवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत एक महिला आणि व्यक्तीचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराचा संसर्ग दूषित पाण्यामूळे होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचे रुग्ण नांदेड गाव आणि आजूबाजूच्या परिसरात अधिक असल्याचे समजते.
पुण्यात 7 जणांचे पथक
पुण्यात गइलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याची गांभीर्याने दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यालयाने घेतली असून पुण्यात सोमवारी सात सदस्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. हे पथक जीबीएस निंयत्रणात आणकरिता व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत करणार आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या सूचनांची दखल
या आजाराची गांभीर्याने दखल पुणे महापालिकेने घेतली असून आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सर्व माहिती जाणून घेतली. तसेच या आजारावर करावयाच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश आबिटकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. नांदेड गाव परिसरात असणाऱ्या विहिरीच्या पाण्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यात यावे, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला केल्या होत्या.
या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा
या सूचनांच्या पार्श्वभूमीवर नांदेड गाव आणि आजूबाजूच्या भागात पालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये नांदेड, किरकटवाडी, डीएसके विश्व, उत्सव, पांडुरंग रेसिडेन्सी, अर्बन पार्क, कमल ग्रीन लीफ, आनंदबल, इंगवले पाटील कॅाम्प्लेक्स, साई गॅलेक्स आदी भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.





