Devendra Fadnavis : ‘राज्यातील शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य’; CM फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय
तीन महिने मोफत धान्य देण्यापासून ते आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांची मालमत्ता 90 दिवसांत जप्त करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 33 जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यापासून ते आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांची मालमत्ता 90 दिवसांत जप्त करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील (डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या) 33 जिल्ह्यांतील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य (3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू) मिळणार आहे.
ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन केले जाणार असून, 90 दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा असेल.
यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. सहा वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून 11.50 मेगावॉट वीजनिर्मितीही केली जाईल.
तसेच, या बैठकीत विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि ग्रंथपालांसाठीही निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ मिळणार आहे.
शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खाजगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक असा महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, 2026 च्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे.
खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांमधील पूर्णवेळ ग्रंथपालांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.
तसेच, महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी रेव्हेन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम लागू होणार असून, एक जिल्हा एक अपील तरतुदीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा केली जाईल. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतुदींच्या सुधारणेस मान्यता देऊन हे विधेयक विधिमंडळासमोर मांडण्यास मंजुरी दिली आहे.






