पंचायत राज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा कडूस – मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत कडूस ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच हेमलता खळदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेचे सचिवपद मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांनी पार पाडले. ग्रामपंचायतीच्या जागेत शिवस्मारक उभारणीसाठी नियोजित जागेचा मिळकत उतार्याची प्रत सरपंच हेमलता खळदकर व उपसरपंच रंजना पानमंद यांच्या हस्ते शिवस्मारक प्रेमींना सुपूर्द करण्यात आली. या वेळी कृषी सहायक ज्योती राक्षे यांनी शेतीसंबंधी शासकीय योजनांची माहिती दिली, तर ग्राममहसूल अधिकारी रूपाली लोंढे यांनी पाणंद रस्त्यांचा आराखडा समजावून सांगितला. माजी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव ढमाले यांनी गावच्या वाढत्या लोकसंख्येचा उल्लेख करून ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. सभेला ग्रामपंचायत सदस्य, महिला व युवकवर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावली. गजानन धायबर, शामराव ढमाले, माजी उपसरपंच कैलास मुसळे, अभिनाथ शेंडे, अशोक बंदावणे, आनंद पानमंद, दिलीप ढमाले, बाळासाहेब बोंबले, बाळासाहेब पांगारे, विशाल ढमाले, वैभव ढमाले, अतुल गारगोटे, अक्षर खळदकर, फौजी शंकर डांगले, बाळासाहेब चिपाडे, रेखा गारगोटे, आशा ढमाले, संगीता नेहरे, शैलेश ढमाले, ईश्वर ढमाले, आबा धायबर, प्रणव केदारी, नामदेव शेंडे आदींसह ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला. या विषयांवर चर्चा ग्रामसभेत गावातील पाणंद रस्त्यांच्या सीमांकनाचा आराखडा तयार करणे, तंटामुक्त गाव, स्वच्छता अभियान, बाजारगाळ्यांचे भाडेतत्त्वावरील व्यवस्थापन, सुविधा केंद्र सुरू करणे, शिवाजी महाराजांचे आकर्षक शिवस्मारक उभारणे, तसेच गावच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय सुरू करणे यासारख्या विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ठराव घेण्यात आले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे खडी-क्रशर व्यवसायासाठी दिलेला ’ना हरकत दाखला’ रद्द करण्याचा व जबाबदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठरावही सभेत मंजूर झाला. यापुढे अशा व्यवसायांसाठी नवीन दाखले न देण्याचा निर्णय घेण्यात आला.