पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पशु आरोग्य शिबिरे

पुणे – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोफत पशु आरोग्य तपासणी शिबिरे राबवली जात आहेत. हा उपक्रम ७ जुलैपासून सुरू झाला असून ३१ जुलैपर्यंत चालणार आहे.
या उपक्रमांतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, भोर, दौंड, पुरंदर, शिरूर, हवेली आणि राजगड (वेल्हा) या तालुक्यांमधील विविध गावांमध्ये आजवर शिबिरे आयोजित करण्यात आली असून शेतकऱ्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. नुकत्याच पार पडलेल्या १६ जुलै रोजीच्या शिबिरांमध्ये थोरांदळे (आंबेगाव), आव्हाळवाडी (हवेली) आणि नाझरे सुपे (पुरंदर) या गावांमध्ये एकूण २९६ जनावरांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरांमध्ये जनावरांची आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे निदान केले जात आहे. त्याचबरोबर जनावरांना लागणाऱ्या जंतनाशक आणि गोचीडनाशक औषधांचे मोफत वाटपही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी संघाच्या इनपुट विभागामार्फत विविध सेवा आणि योजनांची माहिती दिली जात असून त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे —
कात्रज पशुखाद्य (कात्रज १०, २०, २० प्लस, काल्फ स्टार्टर), कडबा कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, मिनरल मिक्सचर, चारा बियाणे, मुरघास बॅग, कृत्रिम रेतन सुविधा, पशुवैद्यकीय औषधे, आयव्हीएफ सेवा, जंतनिर्मूलन, स्वच्छ दूध उत्पादन व सेंद्रिय खते यांसारख्या आधुनिक सुविधा.
या उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले, “या शिबिरांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेता येईल. यामुळे जनावरांची उत्पादकता वाढेल आणि आजारांचे प्रमाण कमी होईल.”
संघाचे चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले की, “अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ८५ दूध संस्थांमधील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत आहोत. यामुळे दूध उत्पादन वाढीसोबतच पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.”
या शिबिरांसाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तीन विशेष वैद्यकीय पथके तयार करण्यात आली असून ते नियोजनबद्ध पद्धतीने गावोगावी फिरून सेवा देत आहेत.
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची संधी मिळाली आहे. अशा प्रकारचे उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचे ठरून, ग्रामीण भागाच्या समृद्धीकडे एक पाऊल ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





