Maharashtra Cabinet Decision : भारताच्या इतिहासात २२ जानेवारी २०२४ चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे संपूर्ण अयोध्या भक्तीमय होऊन जाणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाचा शिधाचं वाटप केला जाणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :- ● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता. ● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी ● शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी. ● ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी ● जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी ● पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता ● महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार ● राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी ● राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत व ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याबाबत.