Fraud IT Companies : महाराष्ट्रात नोकरीच्या नावावर महाघोटाळा! तब्बल १० हजार आयटीयन्स ‘फ्रॉड कंपन्यां’च्या विळख्यात
Fraud IT Companies : फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज (FITE) कडून मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी.

Fraud IT Companies – राज्यातील बनावट नोकरी घोटाळ्यांची यादी ही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात नुकत्याच एका आयटी कंपनीने शेकडो आयटीयन्स तरुणाची फसवणूक केल्याची घटना अद्याप ताजी आहे. दरम्यान महाराष्ट्रात सुमारे दहा हजार तरुण अशा फ्राॅड कंपन्यांच्या विळख्यात अडकले असून याबाबत एसआयटी स्थापन करण्याची मागणी फोरम आॅफ आयटी एम्प्लाइजने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हे निवेदन कामगार मंत्री, आयटी मंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. फ्रेशर विद्यार्थ्यांना नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आकर्षक पगार, तात्काळ नियुक्ती आणि खात्रीशीर नोकरीचे आश्वासन देत अनेक युवकांना जाळ्यात ओढण्यात येते.
हजारो युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगितले जात असून, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत लाखो रुपयांची लूट करुन या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळण्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. फाइटने अशा कंपन्यांची नावे आणि तिथे कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या देखील सरकारला पाठविली आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती व संस्थांची ओळख पटवावी, फसवणूक झालेल्या तरुणांचे पैसे परत मिळवून द्यावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भरती संस्था, कन्सल्टन्सी आणि खासगी आयटी कंपन्यांवर अधिक प्रभावी देखरेख यंत्रणा उभारण्याची गरज आहे असेही निवेदनात म्हटले आहे. हे निवदेन अध्यक्ष पवनजीत माने आणि सचिव प्रशांत पंडित यांनी पाठविले आहे.





