इथेही फसवाफसवी! चीनच्या एका अॅपने भारतीयांचे बुडवले तब्बल २५० कोटी; ५० लाख भारतीयांना फटका

नवी दिल्ली : जगभरात चीनच्या करोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्व जग या व्हायरसला नेस्तनाबूत करण्यासाठी दिवसरात्र झटत आहे. हे सर्व सुरु असताना आता चीनच्या एका अॅपमुळे देशात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
उत्तराखंडमध्ये एका अॅपच्या माध्यमातून २५० कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटकही केली आहे. या आरोपीने चार महिन्यांच्या काळात ही रक्कम चोरली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनच्या एका स्टार्टअप योजनेअंतर्गत तयार झालेल्या एका अॅपने लोकांना गंडा घातला आहे. देशातल्या जवळपास ५० लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले होते. या अॅपच्या माध्यमातून लोकांना १५ दिवसात पैसे दुप्पट होणार असल्याचे आमिष दाखवले जात होते . पैसे दुप्पट होतील असं सांगून लोकांना आधी पॉवर बँक हे अॅप डाऊनलोड करायला सांगितले जायचे आणि त्यानंतर तुमचे पैसे आता १५ दिवसांमध्ये दुप्पट होतील असे आमिष दाखवले जायचे.
हरिद्वारचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने जेव्हा पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. या फिर्यादीने सांगितले की त्याने पैसे दुप्पट होतील म्हणून या अॅपमध्ये दोन वेळा अनुक्रमे ९३ हजार आणि ७२ हजार अशी रक्कम जमा केली होती. मात्र, हे पैसे दुप्पट न झाल्याने या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्याच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.





