धांदात खोटे आरोप; धनंजय मुंडे संतापले, म्हणाले… ज्याने कोणी आरोप करण्याचं काम दिलं….

बीड : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनाही सातत्याने लक्ष्य केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाराचे गंभीर आरोप केले आहेत. आता मात्र, या सर्व आरोपांना मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, शांत बसलो म्हणजे असं समजू नका, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्याबाबत माझं स्पष्ट मत आहे की, त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणे आणि धादांत खोटे आरोप करणे यापलिकडे काहीही नाही. मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, त्या निविदा प्रक्रिया सरकारच्या नियमाप्रमाणे राबवण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील गेल्या ५८ दिवसांपासून अंजली दमानिया हे माझ्यावर वेगवेळे आरोप करत आहेत, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
पुढे म्हणाले, काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दमानिया यांनी असाच एक आरोप केला होता. काही आरोपींचा मर्डर झाला. अशा प्रकारचे सनसनाटी निर्माण करण्यासाठी दमानिया आरोप करतात आणि स्वत:ला प्रसिद्धी मिळवत आहेत. यामधून दुसऱ्यांना बदनाम करण्याच्या पलिकडे दुसरं कीहीही नाही, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडे म्हणाले, माझे मीडियाला चॅलेंज आहे. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कुठे तरी टिकले आहेत का? खरे ठरले आहेत का? दमानिया यांनी असे समजू नये की आम्हाला बोलता येत नाही. एक विषय शांत झाला की दुसरा विषय. माझ्यावर आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले आहे. त्याबद्दल दमानिया यांना शुभेच्छा आहेत, अशी टीकाही धनंजय मुंडे यावेळी केली.
धनंजय मुंडे म्हणाले, आज अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये डीबीटीमध्ये काय असावे? काय नसावे? कोणतीही बाब डीबीटीमधून वगळण्यासाठी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असते. मी कृषीमंत्री असतानाही त्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
अंजली दमानिया यांचे आरोप काय?
महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी टेंडर काढण्यात आले. या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तुंची खरेदी करण्यात आली. त्यासाठी मुंडे यांनी पाठपुरावा करून डीबीटी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या. या सगळ्याच्या माध्यमातून किमान 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.





