परमवीरसिंह यांच्या विरोधात खंडणीचा चौथा गुन्हा दाखल

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी खंडणी वसुलीचा चौथा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह मुंबईतील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका हॉटेल व्यावसायिकाकडून 11 लाख 92 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हॉटेलवर छापा न घालण्यासाठी दर महिन्याला हॉटेल मालकाला हप्ताही ठरवून देण्यात आला होता.
बीसीबी बारचे मालक बिमल आगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन वाझे आणि परमवीरसिंह यांनी आगरवालच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ही खंडणी उकळली आहे. या गुन्ह्यांमध्ये सुमितसिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विजयसिंह, रियाज भाटी हेही आरोपी आहेत.
यातील चिंटू हा परमवीरसिंह आणि सचिन वाझे यांच्यावतीने खंडणी वसुलीचे काम करीत होता. त्याला अटक करण्यात आली आहे. परमवीरसिंह आणि अन्य संबंधितांवर एका बिल्डरकडून पंधरा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही एक गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सीआयडीकडून केली जात आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर परमवीरसिंह यांच्याभोवतीचा फास आता आणखी आवळला गेला असून त्यांना आता अटक होण्याची शक्यताही बळावली आहे.





