नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयकर विभागाची धाड पडणार असल्याची बतावणी करत छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडे ही खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा उच्चशिक्षित तरुण आहे. राज्यात खंडणी, खून, मारामाऱ्या अन् दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे सत्र सुरु आहे. एकीकडे खंडणी, सायबर क्राइममधून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात असतानाच आता थेट राज्यातील माजी मंत्र्यांकडेच खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे. भुजबळ यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तुमच्या त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर माल ठेवला असून तिथे आयकर विभागाची धाड पडणार आहे. त्या पथकात मी देखील असून धाडीत मी सहकार्य करेल, अशी बतावणी खंडणी मागणाऱ्या आरोपीने केली. छगन भुजबळ यांच्या मोबाइलवर फोन करून त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपींमध्ये संवाद झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला संशयित आरोपीने गुजरातमध्ये पैसे घेऊन बोलावले होते, मात्र तिथं हुलकावणी देत करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावले. यावेळी खंडणी मागणाऱ्याला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली. दरम्यान, राहुल भुसारे या उच्चशिक्षित तरुणाने ही खंडणी मागितल्याचे समोर आले असून तो पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.