मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या दोन प्रकरणात त्यांना सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोपरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात परमबीर यांच्यावर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. काय आहे नेमके प्रकरण? बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांनी २००८ मध्ये मे. बालाजी इंटरप्रायजेस आणि मे. राजा रामदेव इंटरप्रायजेस या कंपन्या स्थापन करून २००६ ते २०११ दरम्यान भागीदारीत व्यवसाय केला. नफा वाटप आणि हिशेबाच्या वादांमुळे २०११ मध्ये ही भागीदारी संपुष्टात आली. यानंतर पुनामिया यांनी अग्रवाल यांच्याविरोधात मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये १८ गुन्हे दाखल केले. २०१६ मध्ये पुनामिया यांनी त्यांचा मित्र मनसुखलाल गांधी यांच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. तेव्हा अग्रवाल न्यायालयीन कोठडीत होते. पुनामिया यांनी आपला सहकारी सुनिल जैन आणि हस्तक मनोज घोटकर यांच्यामार्फत अग्रवाल यांचा पुतण्या शरद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. घोटकरने पुनामिया हे सिंग यांचे मित्र असून त्यांचे आर्थिक व्यवहार पाहतात, असे सांगत गुन्ह्यांमधून सुटका आणि नवीन गुन्हे टाळण्यासाठी १५ कोटी ५० लाख रुपये आणि मालमत्ता विकण्याची मागणी केली. तसे न केल्यास पाच वर्ष तुरुंगवासाची धमकी दिली. ३० मार्च रोजी पुनामिया आणि घोटकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पुनामिया यांनी मालमत्तेच्या करारावर जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि डीसीपी अकबर पठाण यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. पठाण यांनी अंधेरीतील कार्यालयात ५० लाख रुपये आणि भाईंदरमधील २ बीएचके फ्लॅटची मागणी करत मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची धमकी दिली. यानंतर सिंग यांच्या घरी शरद यांनी अग्रवाल आणि त्यांचा पुतण्या शुभम यांची भेट घडवली, जिथे आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी पराग मणेरे उपस्थित होते. अटक टाळण्यासाठी अग्रवाल यांनी पुनामिया यांना १५ कोटी ५० लाखांचा धनादेश आणि दोन हप्त्यांत २५-२५ लाख रुपये दिले. पुढे पुनामिया यांनी एसीपी श्रीकांत शिंदे यांना मोक्का प्रकरणात मदतीसाठी २५ लाख रुपये देण्याचा दबाव टाकला, जे अग्रवाल यांनी २५ एप्रिल २०२१ रोजी दिले. तसेच, सिंग आणि पुनामिया यांच्यातील सेटलमेंटअंतर्गत ११ कोटींची मागणी झाली आणि पोलिसांच्या मदतीने अग्रवाल यांच्या कुटुंबावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. छोटा शकीलकडून धमकी सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त असताना पदाचा गैरवापर करून अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलमार्फत पुनामिया यांना धमकी दिल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला. तसेच, खोटे दस्तऐवज बनवून कोट्यवधींची मालमत्ता खंडणीसाठी घेतल्याचा आणि नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांनी ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. अग्रवाल यांनी उसनवारीवरून कोरके यांना ५० लाख रुपये दिले. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात सिंग, पठाण, शिंदे, कोरके, गोपाळे, संजय पाटील, सुनिल जैन आणि पुनामिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.