चार हजार लाडक्या बहिणींनी घेतला अर्ज मागे; परत केलेल्या पैशाचं काय होणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Ladki Bahin Yojana | महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तील अर्जांची पडताळणी सुरू होण्यापूर्वी 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली होती. निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार याची चर्चा सुरू झाली होती.
त्याअनुषंगाने सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरून आतापर्यंत मिळालेले पैसे दंडासहित परत करावे लागण्याच्या भीतीपोटी अनेक महिलांनी लेखी अर्ज देऊन ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे.
आतापर्यंत 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच या महिलांकडून परत आलेल्या निधीचे काय होणार ? याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे ?
याबाबत अदिती तटकरे म्हणाल्या की, “ज्यांच्याकडे वाहने आहेत, उत्पन्न मर्यादा जास्त आहे, इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ परत केला आहे. त्या लाडक्या प्रामाणिक बहिणींचे आभार मानते. पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास बहिणीने ते परत करावे, अशी आम्ही विनंती केली. नियम बाह्य पद्धतीने अर्ज दाखल करणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहे. निकषाबाहेरील तक्रारी आलेल्या अर्जांबाबत पडताळणी सुरू आहे. त्यानुसार अर्ज पडताळणीमध्ये आम्हाला बोगस अर्जाबाबत माहिती मिळेल.” Ladki Bahin Yojana |
“आतापर्यंत अंदाजे 4 हजार महिलांनी अर्ज मागे घेतला. हा फक्त अंदाज आहे, तो आकडा अधिक असू शकतो. योजनेतून नाव मागे घेण्यासाठी हे अर्ज येत आहेत. परिवहन विभाग आणि आयकर विभागाशी समन्वय साधून आम्ही पडताळणी सुरू केली आहे. ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याचा आकडा कमी जास्त होईल. या महिलांकडून परत आलेला निधी पुन्हा सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड आम्हाला तयार करून देतील आणि ते पैसे राज्याच्या तिजोरीत जाईल. आलेला पैसा सरकारी योजना आणि लोककल्याणकारी योजनेत वापरला जाणार आहे, अशी घोषणा अदिती तटकरे यांनी केली. तसेच पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास इतर बहिणींप्रमाणे अर्ज मागे घ्यावा, असेही आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
पिवळे व केशरी धारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही
“आपल्याला दोन वेळा लाभ आला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाहीत त्यावेळी त्यांनी पुढे येऊन राज्य सरकारचा निधी पात्र असण्याच्या पलिकडे त्यांच्याकडे आहे, तो परत करण्याचा निर्णय लाडक्या बहिणींनी घेतला आहे. पिवळे व केशरी धारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. सुरुवातीला जो शासन निर्णय जाहीर केला आहे, त्यानुसारच याची अंमलबजावणी केली जाणार आहे,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
हेही वाचा :





