पंजाब कॉंग्रेसमधील चार नेते भाजपमध्ये दाखल; माजी मंत्र्याचाही समावेश

चंदिगड – पंजाब कॉंग्रेसमधील चार मोठ्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राजकुमार वेरका, बलबीर सिंग सिद्धू, सुंदर शाम अरोरा आणि गुरप्रीत सिंग कांगार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बामला येथील कॉंग्रेसचे माजी आमदार केवल धिल्लन आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार सरुप चंद सिंगला आणि मोहिंदर कौर जोश यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि सोम प्रकाश यांच्यासह पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा आणि भाजपचे वरिष्ठ नेते दुष्यंत गौतम, तरुण चुघ, सुनिल जाखर आणि मनजिंदर सिंग सिरसा यांच्या उपस्थितीत या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
बलवीर सिद्धू हे मोहालीमध्ये तीनवेळा आमदार राहिले आहेत. पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते. तर रामपुरा फुल येथून तीनवेळा आमदार राहिलेले गुरप्रीत कंगगार हे महसूल मंत्री राहिले होते. दलित समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे वेरका हे देखील मजहा येथून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते आणि कॉंग्रेस सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री राहिले होते.
तर सुंदर शाम अरोरा हे उद्योग आणि वाणिज्य मंत्री होते. बलबीर सिद्धू यांचे बंधू अमरजीत सिंग सिद्धू हे मोहालीचे महापौर असून ते यापूर्वीच भाजपमध्ये सामील झाले आहेत.





