Bhagwant Mann: भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ ; कॅम्प ऑफिससह अनेक ठिकाणी CBI ची छापेमारी, ‘या’ प्रकरणात मोठी कारवाई
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदीगड येथील कॅम्प ऑफिसवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापेमारी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann )यांच्या चंदीगड येथील कॅम्प ऑफिसवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) छापेमारी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी राजबीर घुमन यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणीही सीबीआयने झडती घेतली. भ्रष्टाचार, पदाचा कथित गैरवापर आणि सरकारी कामांच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपांशी संबंधित हे प्रकरण आहे.
सीबीआयने मंगळवारी राजबीर घुमन यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय मंजुरी, सरकारी निविदा (टेंडर) आणि धोरणांमध्ये बदल करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयातील पदाचा कथित गैरवापर झाल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे. (Bhagwant Mann)
या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून सीबीआयच्या पथकांनी चंदीगड, मोहाली, गुरुदासपूर, लुधियाना, पटियाला, संगरूर आणि जालंधर यांसह विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईदरम्यान लॅपटॉप, मोबाईल फोन, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, चंदीगड येथील मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये संध्याकाळी सुमारे सहा वाजता छापेमारी करण्यात आली. या कार्यालयात राजबीर घुमन हे सहआरोपींना भेटत असल्याचा आरोप आहे. याशिवाय, संगरूर जिल्ह्यातील घराचोन या त्यांच्या गावातील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
ईडीच्या अहवालानंतर प्रकरण सीबीआयकडे (Bhagwant Mann)
या प्रकरणाची सुरुवात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अहवालातून झाल्याचे सांगितले जाते. कथित घोटाळ्याबाबत ईडीने पंजाब पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, या प्रकरणात अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले. त्यानंतर न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून पंजाब आणि चंदीगडमधील विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.
या प्रकरणातील एफआयआरमध्ये राजबीर घुमन यांच्यासह नितीन गोहल, जितीन गोहल उर्फ राजा, रोमी राजा महाजन, बीर देविंदर आणि आर. एस. नागरा यांची नावे आहेत. याशिवाय, काही अज्ञात सरकारी अधिकारी आणि खासगी व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले आहे.
‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ प्रकरणात नेमके आरोप काय? (Bhagwant Mann)
सीबीआयच्या आरोपानुसार, नितीन गोहल हा कथित ‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करत होता आणि त्याचे राजबीर घुमन यांच्याशी संपर्क होते. नितीन गोहलचा भाऊ जितीन गोहल याला घुमन आणि डॉ. रोमी महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रवेश मिळाल्याचा आरोप आहे.
डॉ. रोमी महाजन यांनी राजबीर घुमन यांच्यासोबत काम करत नियुक्त्या आणि अन्य प्रशासकीय कामांमध्ये समन्वय साधल्याचा आरोपही तपास यंत्रणेने केला आहे. तर बीर देविंदर हा आम आदमी पक्षाशी संबंधित युवा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
भगवंत मान यांचा भाजपवर निशाणा (Bhagwant Mann)
सीबीआयच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर टीका केली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारची आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ( Bhagwant Mann)
दरम्यान, या प्रकरणामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले असून, सीबीआयच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे. संबंधित व्यक्तींवरील आरोप अद्याप तपासाच्या अधीन असून, त्यांची दोषसिद्धी झालेली नाही.





