Bangladesh : हिंदूवरील हल्ल्याबद्दल बांगलादेशात चौघांना अटक

Bangladesh – बांगलादेशाच्या उत्तरेकडील सुनमगंज जिल्ह्यात हिंदू मंदिरांवर, घरांवर आणि दुकानांवर हल्ले करून तोडफोड केल्पाप्रकरणी आज चौघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अन्य १२ जणांविरोधात आणि १५० ते १७० अज्ञात व्यक्तींविरोधात प्रकरण दाखल देखील केले आहे.
अलीम हुसैन (१९), सुलतान अहमद राजू (२०), इम्रान हुसैन (३१) आणि शजहान हुसेन (२०) यांना या महिन्याच्या सुरुवातीला सुनमगंज जिल्ह्यातील दोराबाजार परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दिनांक ३ डिसेंबर रोजी सुनमगंज जिल्ह्यातील आकाश दास या रहिवाशाने फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता.
ही पोस्ट डीलीट केल्यानंतरही या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या परिसरात हिंसाचार भडकला होता. याच दिवशी पोलिसांनी दास याला अटक केली होती. पण जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
नंतर जमावाने लोकनाथ मंदिरासह काही स्थानिक हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले करून तोडफोड केली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी सखोल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.





