पिंपरी – क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींकडून आठ मोबाइलसह 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राजवाडेनगर, काळेवाडी येथे पोलिसांनी शनिवारी (दि. 2) सायंकाळी ही कारवाई केली.
सनी उर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल (वय 38, रा. काळेवाडी) रिक्की राजेश खेमचंदानी (वय 36 रा. डीलक्स थिएटरमागे, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय 57, रा. रेल्वे स्टेशनजवळ, पिंपरी) आणि सनी सुखेजा (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण यांनी रविवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल या क्रिकेट मॅचवर आरोपी सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडीतील राजवाडेनगर येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून आठ मोबाईल, जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 27 लाख 25 हजार 450 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
छापा टाकल्यानंतर पोलीस आरोपीला पकडायला गेले असता आरोपी सनी गिल याने ‘मला हात लावायचा नाही. माझी ओळख लांबपर्यंत आहे. माझ्यावर काही कारवाई झाल्यास चांगले होणार नाही’, अशी धमकी दिली. तसेच पोलिसांशी झटापट केली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.