जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवरील गोळीबार प्रकरणी माजी सरपंचांना अटक

बारामती: जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील गुन्ह्यात माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. गुन्हेगारांना चिथावणी दिल्याप्रकरणी तावरे यास ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवान यांनी दिली आहे.
दि. 31 मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता रविराज तावरे यांच्यावर माळेगावात मोरे टोळीने गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात यापूर्वी प्रशांत पोपटराव मोरे (वय ४७, रा. शिवनगर, माळेगाव), विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे व राहुल उर्फ रिबल कृष्णांत यादव व एका अल्पवयीनावर मोक्कांतर्गत कारवाई झाली असून हे चौघेही अटकेत आहेत. यातील अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात दाखल आहे.
तावरे हे पत्नीसह वडापाव घेवून मोटारीकडे येत असताना त्यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी रोहिणी रविराज तावरे यांनी फिर्य़ाद दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या रविराज यांच्यावरील गोळीबाराने तालुक्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी घटनेनंतरच पाच तासातच आरोपींना जेरबंद केले होते.
जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा रोष मनात धरून फिर्यादी व त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न मोरे टोळीकडून केला जात होता. त्यातून राजकिय व आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने रविराज यांना संपवून दहशत माजविण्यासाठी कट रचून अल्पवयीन मुलामार्फत खूनी हल्ला केला गेला.
पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह शस्त्र अधिनियम १२० ब आदी कलमांनुसार मोरे टोळीवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या रविराज यांचा पोलिसांनी रुग्णालयात जात जबाब घेतला होता. त्यात त्यांनी गावातील राजकीय पदाधिकारी यांचा यात सहभाग असल्याचे सांगत पोलिसांनी खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचावे अशी मागणी केली होती.
या घटनेचा अधिक तपास केला असता, आरोपींना जयदीप दिलीप तावरे यांनी चिथावणी दिली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर भांदवि कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक ढवाण यांनी सांगितले.
मोरे टोळीतील सदस्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. प्रशांत मोरे याच्यावर नऊ, विनोद मोरे याच्यावर सात तर राहूल याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे





