मनमोहन सिंग यांचे स्मारक कुठे होणार? सरकारने दिली ‘ही’ जागा, माजी पंतप्रधानांच्या कुटुंबाचीही संमती

Manmohan Singh Memorial | भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांचे स्मारक नक्की कुठे होणार? याबाबत गेल्याकाही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. अखेर सरकारकडून माजी पंतप्रधानांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, मनमोहन सिंग यांच्या कुटुंबानेही या जागेला संमती दिली आहे.
मनमोहन सिंग यांचे स्मारक दिल्लीत राजघाटाच्या जवळ राष्ट्रीय स्मृती स्थळावर बांधले जाणार आहे. भारत सरकारने या स्मारकासाठी 900 चौरस मीटर जागा निश्चित केली आहे. काही दिवसांपूर्वी सिंग यांच्या यांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी या स्थळाची पाहणी केली होती. त्याआधी सिंग यांच्या दोन्ही मुलींनीही त्यांच्या पतींसोबत या जागेला भेट दिली होती. या जागेवर त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यानंतरच त्यांनी केंद्र सरकारला अधिकृत संमती दिली.
सध्या राष्ट्रीय स्मृती स्थळावर केवळ माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या ठिकाणी केवळ दोनच जागा रिकाम्या आहेत. या जागेवरील मनमोहन सिंग याचे शेवटचे स्मारक असू शकते.
2013 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातच केंद्रीय मंत्रिमंडळाने हा ‘सामूहिक स्मारक स्थळ’ तयार करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. जेणेकरून, भविष्यात स्वतंत्र स्मारकांसाठी वेगळी जागा वाटप करण्याची गरज राहणार नाही. आता, त्यांचे कुटुंब या संकुलातील शेवटच्या उपलब्ध जागांपैकी एक जागा स्वीकारत आहे.
रिपोर्टनुसार, मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याचे काम एका ट्रस्टकडे दिले जाणार आहे. या ट्रस्टची स्थापना त्यांच्या कुटुंबाकडून केली जाईल. या ट्रस्टला सरकारकडून 25 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यावेळी केंद्र सरकारने घोषणा केली होती की, मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ योग्य जागा शोधून स्मारक उभारले जाईल.





