पत्नी, वकील आणि पक्षाच्या नेत्यांनाही भेटू शकणार नाहीत इम्रान खान, पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब सरकारने सोमवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य, वकील आणि पक्षाच्या नेत्यांना 18 ऑक्टोबरपर्यंत भेटण्यास बंदी घातली आहे. इम्रान यांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर त्यांच्या (इमरान खान) पक्षाचे नेते सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत, तर आगामी एससीओ शिखर परिषद डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साप (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान हे अनेक प्रकरणांमध्ये ऑगस्ट 2023 पासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत.
इस्लामाबादमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी केला आहे.
‘सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय’ –
पंजाब सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तुरुंगात असलेले पीटीआयचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना 18 ऑक्टोबरपर्यंत रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात त्यांचे कुटुंबीय, वकील आणि पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे.” सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने हा निर्णय घेतल्याचे अधिकारी म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी SCO समिट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
SCO मध्ये सुरक्षेसाठी लष्कराला पाचारण: पंतप्रधान
पीएमएल-एनच्या शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने आरोप केला आहे की पीटीआय शिखर परिषद उधळून लावण्यासाठी इस्लामाबादमध्ये निदर्शने करत आहे. SCO शिखर परिषदेसाठी सुरक्षा पुरवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. यापूर्वी पीटीआयच्या संस्थापकाला मदत केल्याच्या आरोपावरून सुरक्षा यंत्रणांनी अदियाला तुरुंगातील सहा कर्मचाऱ्यांना अटक केली होती.
पीटीआय न्यायालयात जाणार –
पीटीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, इम्रान खान यांची कायदे टीम कोर्टात याचिका दाखल करेल आणि इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या भेटीवरील बंदी उठवण्याची विनंती करेल. पीटीआय समर्थक इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीसह पाकिस्तानचे अनेक भागात सरकारविरोधी निदर्शने करत आहेत.





