England Cricket : न्यूझीलंडच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची इंग्लंडच्या तिन्ही फॉरमॅटच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती…

Brendon Mccullum England Coach White Ball : ब्रेंडन मॅक्क्युलम इंग्लंड क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटचे प्रशिक्षक बनले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) मंगळवारी ही माहिती दिली. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम याआधी इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक होता. त्याची भूमिका वाढवून, ECB ने आता त्याला ODI आणि T20 संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देखील दिली आहे.
मॅक्युलमच्या आधी मॅथ्यू मॉट ही जबाबदारी सांभाळत होते. 2024 च्या T20 विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. मॅथ्यू मॉटच्या रवानगीनंतर मार्कस ट्रेस्कोथिकला इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेत ट्रेस्कोथिक हे अंतरिम प्रशिक्षक असतील. ब्रेंडन मॅक्क्युलम 1 जानेवारी 2025 पासून इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी20 संघांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
Introducing our new England Men’s white-ball head coach! 🏏 ⚪
Our England Men’s Test head coach! 🔴
— England Cricket (@englandcricket) September 3, 2024
जे मॅक्युलमला ओळखतात त्यांना माहित आहे की तो एक तुफानी फलंदाज होता आणि तो क्रीझवर येताच बॅटने कहर घालायचा. निवृत्तीनंतर प्रशिक्षक झाल्यावर त्यांनी ही शैली संपूर्ण संघावर अंमलात आणली, जी ‘बेझबॉल’ (Bazball) म्हणून ओळखली जाते. इंग्लंडने आपल्या प्रशिक्षक मॅक्युलमची ही शैली अगदी सहज अंगीकारली आहे. आता असे दिसून येते की इंग्लंडचे फलंदाज प्रत्येक परिस्थितीत आक्रमक क्रिकेट खेळतात. संघ दबावाखाली असला किंवा विकेट पडत राहिल्या तरी ते दडपणाखाली येत नाहीत. काही वेळा यामुळे संघाचे नुकसानही होते, पण एकंदरीत फायदाच झालेला आहे.
ब्रेंडन मॅक्क्युलमचा नवा करार 2027 अखेरपर्यंत आहे. यादरम्यान कोणताही बदल न झाल्यास इंग्लंड जवळपास साडेतीन वर्षे एकाच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. आपल्या नव्या कराराबद्दल मॅक्युलम म्हणाला, “हे एक नवीन आव्हान आहे आणि मी ते स्वीकारले आहे. येत्या काही आठवड्यांत आम्ही काही निर्णय घेऊ. त्याची सुरुवात आधीच झाली आहे.”
आता तिन्ही फॉरमॅटचे प्रशिक्षक बनल्यानंतर टी-20 विश्वचषक 2026, एकदिवसीय विश्वचषक 2027, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मध्ये इंग्लंडकडून चांगली कामगिरी करण्याचा भार ब्रेंडन मॅक्क्युलमच्या खांद्यावर असेल. .





