Brendon McCullum : ‘भारतीय संघ चांगल्या तयारीसह आला असेल, पण…’, कसोटी मालिकेपूर्वी ब्रेंडन मॅक्युलमचं मोठं वक्तव्य

Brendon McCullum praises India’s cricketing prowess : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून पहिला सामना २० जून रोजी खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा शुबमन गिलकडे आहे. भारतीय कसोटी संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली आहे. परंतु २००७ पासून टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत, युवा टीम इंडियाची खरी परीक्षा असेल. कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने मोठं वक्तव्य केलं आहे.
भारतीय संघाबद्दल ब्रेंडन मॅकुलम काय म्हणाले?
ब्रेंडन मॅकुलमने स्काय स्पोर्ट्स क्रिकेटला सांगितले, “तो एक उत्कृष्ट क्रिकेट खेळणारा देश आहे, जो मोठ्या अपेक्षांसह इथे आला असेल आणि आम्ही त्यांच्या आव्हानासाठी तयार आहोत. खेळाडूंचं ताजंतवानं राहणं गरजेचं आहे. टेस्ट संघ म्हणून आम्हाला कुठे पोहोचायचं हे माहिती आहे. आमचे काही चांगले वेगवान गोलंदाज खेळण्यासाठी उपलब्ध नसतील, पण क्रिस वोक्स, सॅम कूक, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांमुळे आमच्याकडे चांगलं आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं आक्रमण आहे.”
भारताविरुद्ध आमची कसोटी असेल –
ब्रेंडन मॅकुलम पुढे म्हणाले, “आमच्या फिरकी गोलंदाजी विभागात शोएब बशीर आहे, जो कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने आपला खेळ सुधारत आहे. आम्हाला माहिती आहे की भारताविरुद्ध आमची कसोटी असेल आणि ते पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील. बेथेलसमोर अजून खूप मोठं करिअर आहे. तो फक्त २१ वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे आपली प्रतिभा दाखवण्याची संधी आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये आधीच आपलं स्थान निर्माण करून आहे.”
हेही वाचा – WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास; अजिंक्य रहाणेला मागे टाकत बनला नंबर वन!
डकेट-क्रॉलीचे मॅकुलमकडून कौतुक –
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “जेमी स्मिथ आणि बेन डकेट यांनी मला टेस्ट सामन्यात डकेट आणि झॅक क्रॉलीच्या जोडीची आठवण करून दिली. आपल्याला माहित आहे की डकेट किती उत्तम फलंदाज आहे, पण स्मिथकडे असलेली ताकद कमाल आहे.”





