नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

Nashik Politics | राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर नाराजी नाट्यानंतर मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. तर आता दुसरीकडे येवल्यातील भुजबळ यांचे विरोधक आणि विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश देत शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणुकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी दंड थोपटले होते. आता दराडे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाची साथ सोडत शुक्रवारी (२३ मे) रात्री उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. आता हे दोन्ही बंधु एकत्र आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच ठाकरे गटातील हा बडा नेता शिंदेंच्या गळाला लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयातील महायुतीचे गणित बदलणार आहे. त्याचा फायदा छगन भुजबळ यांना होण्याची शक्यता आहे.
भुजबळ विरुद्ध शिंदेंची शिवसेना?
छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी हा संघर्ष अधिकच वाढला. त्याआधी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे या सर्वांनीच भुजबळ यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली.
आगामी संघर्षाची नांदी
येवला तालुक्यात दराडे हे मंत्री छगन भुजबळ यांचे प्रबळ राजकीय विरोधक असून, दराडे विरुद्ध भुजबळ यांचा संघर्ष सर्वश्रृत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दराडेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यामागे बळ उभे केले होते. त्यामुळे भुजबळ विरुद्ध दराडे असा संघर्ष रंगला होता. आता दराडे यांनी थेट शिंदे गटाची निवड करत महायुतीत एन्ट्री घेतली आहे.
हेही वाचा:





