Shiv Sena UBT : औसा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकर माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यात ठाकरेसेना नेतृत्वविहीन होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचे दिसतआहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा मजबूत प्रभाव असलेल्या औसा विधानसभेची जागा शिवसेनेकडे खेचून आणण्याचे काम दिनकर माने यांनी केले होते, तेही सलग दोन वेळा, तेच आता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचे काम आम्ही केले. मात्र, पुढील काळात शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे लातूर जिल्ह्यावर लक्ष नव्हते. संघटनात्मक पातळीवर शिवसेना कमजोर होत गेली. शिवसैनकांची कामे वेळेवर होत नाहीत, या सर्व कारणामुळे राज्याचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसठी काम करावे यासाठी भाजपात पक्षप्रवेश करत असल्याचे माने यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश औसा तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरण्याची चिन्हे आहेत. कारण, दिनकर माने यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.