Arun Jagtap : नगरचं राजकारण ढवळून काढणारा नेता हरपला; माजी आमदार अरुण जगताप यांचं पुण्यात निधन

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय 67) यांचे आज 2 मे रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तब्बल एक महिना अरुण काका जगताप यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते व्याही होते.
अहिल्यानगर शहरासह राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकारणात ते ‘काका’ म्हणून परिचित होते. काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. अरुणकाका यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता अहिल्यानगर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होतील.
अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द
दिवंगत अरुणकाका जगताप यांनी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. नगरपालिकेत ते नगरसेवक झाले. सलग पाच वर्ष ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. दोनवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. अहमदनगर शहर मतदारसंघातून मात्र ते दोनवेळा पराभूत झाले. महापालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.
मात्र, स्वत:ऐवजी त्यांनी त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. आर्युवेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला. घोडेस्वारी, नव्या गाड्यांचा छंद. शेती, उद्योग, हॉटेल व्यवसायात त्यांना विशेष रुची होती.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वाहिली श्रद्धांजली
माजी विधान परिषद सदस्य, माझे सहकारी आ. संग्राम भैय्या जगताप यांचे वडील व आमचे मार्गदर्शक अरुण काका जगताप यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण, क्रीडा, सहकार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले एक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. जगताप कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर स्व.अरुण काकांच्या आत्म्यास चिर:शांती प्रदान करो. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
माजी विधान परिषद सदस्य, माझे सहकारी आ. संग्राम भैय्या जगताप यांचे वडील व आमचे मार्गदर्शक अरुण काका जगताप यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण, क्रीडा, सहकार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले एक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
जगताप… pic.twitter.com/XSeWTFZRCD
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 2, 2025





