उंडाळे (ता.कराड) : कराड दक्षिणचे ज्येष्ठ नेते, उंडाळे गावचे सुपुत्र, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कै. जयसिंगराव पाटील (बापू) यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. माजी आमदार कै. विलासराव पाटील काका यांचे ते थोरले बंधू होते. कराड दक्षिणचा राजकारणामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. तळागाळातला नेता म्हणून त्यांची ओळख होती. विलासराव पाटील काका यांचे ग्रामीण भागातील जनतेचा आवाज त्यांच्या समस्या सोडवण्यात मोठे योगदान होते. उच्चस्तरीय राजकारण काका पाहत होते व जयसिंगराव पाटील बापू स्थानिक राजकारण पहात होते. त्यांच्या निधनाने कराड दक्षिण सह कराड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जयसिंगराव पाटील (बापू) यांनी आयुष्यभर ग्रामीण विकास, सहकार चळवळ आणि सामाजिक कार्यासाठी आपले योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली रयत सहकारी साखर कारखान्याने अनेक प्रगतीची शिखरे गाठली. त्यांच्या साध्या, सरळ आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. दरम्यान, त्यांचे पार्थिव आज दुपारी १२ वाजता स्व. दादासाहेब उंडाळकर शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर अंत्यसंस्कार सायंकाळी ५ वाजता कृष्णतबुवा मंदिराशेजारी पार पडणार आहेत.