सातारा (प्रतिनिधी) – माजी गृह राज्यमंत्री व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना करोनाची लागण झाली आहे. देसाई यांना मुंबई येथील सुरूची हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देऊन राज्यामध्ये सत्तापालट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याच्या येऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही शंभूराज देसाई यांना वजनदार खाते मिळण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गेल्या पाच दिवसांपासून शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात येऊन पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते पाटण तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात दौऱ्यावर गेले होते. त्याचदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
मला आज कोरोनाची लागण झाली आहे.
मी सुरूची या मुंबई येथील माझे शासकीय निवासस्थानी गृह विलगीकरणात उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली असून डॉक्टरांचे म्हणण्यानुसार काळजी चे कोणतेही कारण नाही.— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) July 11, 2022
शंभूराज देसाई यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. मात्र, लक्षणे सौम्य असून आपली प्रकृती ठणठणीत आहे व येत्या चार- पाच दिवसांतच यामधून बाहेर पडू, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचे सांगण्यात आले.