चंदिगढ : हरियाणातील माजी मंत्री कॅप्टन अजयसिंह यादव यांनी गुरूवारी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्या राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगल्यानंतर कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यादव यांच्या निर्णयातून ती उघड झाल्याचे मानले जात आहे. कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा 65 वर्षीय यादव यांच्याकडे होती. त्या पदाचाही राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली. यादव यांचे कुटूंब तब्बल ७० वर्षांपासून कॉंग्रेसशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचा निर्णय पक्षासाठी मोठा हादरा मानला जात आहे. कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांनी सोडल्यापासून पक्षातून अयोग्य वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी त्यांची ओळख होती. यावेळच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावर हुडा यांचा वरचष्मा होता. त्या तिकीट वाटपावरही यादव नाराज असल्याचे दडून राहिले नव्हते. त्यांच्या मुलाला यावेळी कॉंग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र, यादवपुत्राला पराभव पत्करावा लागला. निवडणूक निकाल जाहीर होण्याला काही दिवस झाले असतानाच यादव यांच्यासारखा ज्येष्ठ नेता कॉंग्रेसमधून बाहेर पडला आहे.