Shahid Afridi : “त्यांना क्रिकेटबद्दल काहीच माहित नाहीये…”,चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शाहिद आफ्रिदीची पीसीबी अध्यक्षांवर टीका

Shahid Afridi criticizes PCB chairman : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या लीग टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या स्पर्धेत पाकिस्तान यजमान संघ होता. एवढेच नाही तर पाकिस्तान संघ गतविजेता देखील होता, परंतु लीग टप्प्यात त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर, पाकिस्तान क्रिकेटमधील लोक आता एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. अलिकडेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही –
माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान आफ्रिदीने सांगितले की, जेव्हा तो मोहसीन नक्वीशी बोलला तेव्हा पीसीबी प्रमुखांनी त्याला सांगितले की त्यांना क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही. क्रिकेट बोर्ड चालवणाऱ्या प्रमुखाला खेळाबद्दल काहीही माहिती नाही ही खरंच मोठी गोष्ट आहे.
मोहसीन नक्वी यांची ओळख राजकारणी म्हणून झाली आहे. पाकिस्तानच्या समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदी मोहसीन नक्वीबद्दल म्हणाला,’काही दिवसांपूर्वी मी लाहोरमध्ये अध्यक्ष साहेबांना भेटलो. मैदानाबाबतचा उपक्रम, गद्दाफी स्टेडियममध्ये केलेले काम खूप चांगले आणि सुंदर आहे. त्यांनी काम केले आहे आणि त्यांमा पुढेही काम करायचे आहे, पण क्रिकेटबद्दल त्यांचे विचार वेगळे होते.’
अध्यक्षांनी क्रिकेटबद्दल माहिती असणाऱ्या लोकांसोबत काम करावे –
आफ्रिदीने नक्वीवर हल्ला चढवत म्हटले की, ”त्यांनी स्वतःला अशा नोकरशहांनी वेढून ठेवले आहे, ज्यांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे अध्यक्ष साहेबांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही. जेव्हा तुम्हाला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नसते, तेव्हा तुम्ही चांगल्या लोकांसोबत काम केले पाहिजे, ज्यांना या खेळाबद्दल माहिती आहे.”





