माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांच्यावर वाढदिवसाच्या दिवशीच ईडीची कारवाई

Bhupesh Baghel Son Arrested | छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मोठा धक्का बसला आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भूपेश बघेल यांच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील निवासस्थानी आणि इतर ठिकाणांवर छापेमारी केली. याचवेळी भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना ईडीने शुक्रवारी अटक केली.
चैतन्य यांच्यावर पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने चैतन्य यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. मद्यघोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगमध्ये चैतन्य यांचा हात असल्याचा ईडीचा आरोप आहे.
भूपेश बघेल यांचे भावनिक पोस्ट
मुलाच्या अटकेवर माजी मुख्यमंत्र्यांनी भावनिक पोस्ट केली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लिहिले आहे, “जन्मदिनाला जे भेटवस्तू मोदी आणि शाहजी देतात, तशी भेट जगातील कोणत्याही लोकशाहीत कोणी देऊ शकत नाही. माझ्या जन्मदिनी या दोन्ही आदरणीय नेत्यांनी माझ्या सल्लागार आणि दोन ओएसडीच्या घरांवर ईडी पाठवली होती. आता माझ्या मुलाच्या, चैतन्यच्या जन्मदिनी माझ्या घरावर ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे. या भेटीसाठी धन्यवाद. हे आयुष्यभर स्मरणात राहील.”
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “यापूर्वी कवासी लखमा यांना लक्ष्य केले, देवेंद्र यादव यांना लक्ष्य केले आणि आता माझ्या मुलाला लक्ष्य केले जात आहे. अदानी यांच्या कंपनीसाठी तमनार येथे अनेक वृक्ष कापण्यात येणार होती. त्याविरोधात आम्ही सभागृहात आवाज उठवणार होतो. त्याआधी साहेबांनी ईडीला आमच्याकडे पाठवले,जेणेकरून कोणीही अदाणीविरुद्ध आवाज उठवू नये. पण आम्ही घाबरणार नाही, ना झुकणार,” असा इशारा देखील भूपेश बघेल यांनी आपल्या पोस्टद्वारे दिला आहे. Bhupesh Baghel Son Arrested |
घोटाळ्याचा तपशील
ईडीचा आरोप आहे की, छत्तीसगडमधील अधिकारी, नेते आणि दारू व्यापाऱ्यांनी एक योजना राबवली. यामध्ये 2019 ते 2022 दरम्यान छत्तीसगडमध्ये दारूच्या विक्रीतून सुमारे 2161 कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली झाली. या प्रकरणात दारू पुरवठा साखळीत हेराफेरी झाली. Bhupesh Baghel Son Arrested |
घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. या घोटाळ्यातील १७ कोटींची रक्कम ही चैतन्य यांच्याशी संबंधित कंपन्यांना मिळाली, असा ईडीचा आरोप असून या घोटाळ्याशी संबंधित १,०७० कोटी रुपयांची रक्कम व चैतन्य यांचा त्याच्याशी असणारा संबंध याचा ईडी तपास करत आहे. या घोटाळ्यामुळे राज्य सरकारच्या महसुलाचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला आणि मद्य व्यावसायिकांच्या टोळीला २,१०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली.
हेही वाचा :
मोठा बदल..! ‘या’ लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कायमचे बंद, सरकारचा धक्कादायक निर्णय





