Minister Tang Renjian : ‘या’ माजी कृषी मंत्र्याला सर्वात मोठी शिक्षा, नेमकं प्रकरण काय

बीजिंग : चीनचे माजी कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्री तांग रेनजियान यांना लाचखोरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना दोन वर्षांची सवलत देखील दिली गेली आहे. त्यांच्यावर ३८ दशलक्ष डॉलरची लाच स्वीकारल्याचा आरोप होता.
तांग हे चीनच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या कृषी मंत्रालयातील माजी सचिव देखील आहेत. त्यांचे राजकीय अधिकार आयुष्यभरासाठी काढून घेण्यात आले आहेत. तसेच त्यांची सर्व वैयक्तिक मालमत्ता जप्त केली जाईल आणि लाचखोरीतून मिळवलेली संपत्ती सरकारी खजिन्यात जमा केली जाणार आहे. चीनच्या इशान्येकडील जिलिन प्रांतातील चांगचून येथील पीपल्स कोर्टाने हा निकालसुनावला.
तांग यांनी २००७ ते २०२४ दरम्यान तांग यांनी आपल्या वेगवेगळ्या पदांचा गैरफायदा घेतला. प्रांतीय आणि राष्ट्रीय पातळीवरील त्यांनी उद्योग, प्रकल्पांची कंत्राटे आणि नोकऱ्यांमधील तडजोडीमध्ये आपला प्रभाव वापरून अनेकांचा लाभ करून दिला. त्याबदल्यात तांग यांनी आर्थिक लाभ आणि मौल्यवान वस्तू मिळून २६८ दशलक्ष युआन (३८ दशलक्ष डॉलर) मिळवल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
तांग यांनी त्याच्या शेवटच्या निवेदनात गुन्हा कबूल केला आणि पश्चात्ताप व्यक्त केला. तांग यांच्या गैरव्यवहारांमुळे देशाचे आणि जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असे सांगून न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पण तांग यांनी दिलेल्या कबुलीजबाबामुळे न्यायालयाने अंतिम निवाड्यामध्ये तांग यांच्याबाबत उदारता दाखवली.





