छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दणका; निवासस्थानी ‘CBI’चा छापा, नेमकं प्रकरण काय?

Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ६ हजार कोटी रुपयांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक रायपूर आणि भिलाई येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ईडीच्या पथकाने भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय पथकांनी बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानावर तसेच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या निवासस्थानावर छापे टाकले आहेत. सीबीआयचे पथक घराच्या आत चौकशी करत असून घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ED) २ हजार २९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त तसेच गोठवली आहे. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी १० मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलासह इतरांच्या घरांवर छापे टाकले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले.
सीबीआयच्या छाप्याबाबत भूपेश बघेल यांच्या कार्यालयांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगण्यात आले आहे की, ‘आता सीबीआय आली आहे. आगामी ८ आणि ९ एप्रिल रोजी अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या एआयसीसी बैठकीसाठी स्थापन केलेल्या ‘मसुदा समिती’च्या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आज दिल्लीला जाणार आहेत. त्याआधीच सीबीआयचे अधिकारी रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
राजकीयदृष्ट्या स्पर्धा करू शकत नसल्याने भाजप घाबरली : सुशील आनंद शुक्ला
काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला म्हणाले, “यापूर्वी त्यांनी (भाजप) ईडीला त्यांच्या निवासस्थानी पाठवले होते. आज सीबीआय अधिकारी भूपेश बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानी आले आहेत. त्यांचा आज दिल्लीला जाण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी भाजपने आज त्यांच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक पाठवले आहे. राजकीयदृष्ट्या स्पर्धा करू शकत नसल्याने भाजप घाबरली आहे.”
अब CBI आई है.
आगामी 8 और 9 अप्रैल को अहमदाबाद (गुजरात) में होने वाली AICC की बैठक के लिए गठित “ड्राफ़्टिंग कमेटी” की मीटिंग के लिए आज पूर्व मुख्यमंत्री भूपेश बघेल का दिल्ली जाने का कार्यक्रम है.
उससे पूर्व ही CBI रायपुर और भिलाई निवास पहुँच चुकी है.
(कार्यालय-भूपेश बघेल)
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) March 26, 2025





