महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली राजकारणी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये सध्या जो शाब्दिक संघर्ष सुरू आहे त्यावरून विविध प्रकारची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इतर अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी वाटेल तशी वादग्रस्त विधाने केल्यामुळे आता त्यांना ‘तोल मोल के बोल’ असा सल्ला देण्याची वेळ आली आहे. नारायण राणे यांचे धाकटे पुत्र नितेश राणे हे नेहमीच फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि भाजपचे मंत्री असल्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांच्या विधानांना उत्तर देण्याची कामगिरी भाजपाने त्यांच्यावर सोपवली होती. पण धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना भाजपचा मुख्यमंत्री हा सर्वांचा बाप असल्याचे विधान त्यांनी केल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे कान उपटले. महायुतीमध्ये एकत्रपणे काम करत असताना अशा प्रकारची विधाने बरोबर नाहीत, असा सल्ला दिला. नारायण राणे भाजपचे नेते म्हणून केंद्रात मंत्री होते. त्यांचा मोठा मुलगा निलेश राणे हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदार आहे आणि धाकटा मुलगा हा भाजपचा नेता म्हणून राज्यमंत्रिमंडळात मंत्री आहे. राजकीय सोय म्हणून या सर्व घडामोडी केल्या असल्या तरी आता राणे बंधूंमध्ये प्रथमच जाहीर संघर्ष झाल्यामुळे त्याची चर्चा होणे साहजिक आहे. अर्थात, या घटनेनंतर नारायण राणेंनी स्वतःही एक वादग्रस्त विधान करून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देण्याचे काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वच मंत्र्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला असला, तरी क्रियेला प्रतिक्रिया देताना अनेकवेळा आपण काय बोलतोय याचे भान राहत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी काहीही बोलले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. गिरीश महाजन यांनी ‘शिवसेना आता जमीनदोस्त झाली आहे’ अशा प्रकारचे एक विधान केले. तसेच गेल्या अडीच वर्षाचा कालावधी भाजपासाठी वाईट होता. संपूर्ण भाजपची सत्ता येईल तेव्हाच वातावरण चांगले होईल, अशा प्रकारचे विधानही त्यांनी केले आहे. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात नव्याने समावेश झाल्यानंतरसुद्धा त्यांनी अशाच प्रकारची काही वादग्रस्त विधाने केली होती. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मनात आले तर छगन भुजबळ उपमुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतील असे विधानही त्यांनी केले होते. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री माणिकराव कोकाटे सतत वादग्रस्त आणि चर्चेत येणारी विधाने करत असतात. ‘कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे’ असे विधान करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केल्यामुळे अजित पवारांनी त्यांना समज दिली होती. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी विधाने करताना विरोधी पक्षांना जर लक्ष्य केले तर ती बाजू समजण्यासारखी आहे. पण गेल्या काही कालावधीमध्ये महायुतीचे नेते आणि मंत्री एकमेकांवरच टीका करत आहेत. अजित पवार अर्थमंत्री असल्याने ते आम्हाला पुरेसा निधी देत नाहीत अशा प्रकारचा आक्षेप शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नोंदवला होता. घटक पक्ष असणार्या पक्षांची धोरणे जरी वेगळी असली तरी एक सरकार म्हणून लोकांसमोर जात असताना आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत हे दाखवण्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. पण विविध मंत्री सध्या ज्या प्रकारची विधाने करत आहेत ते पाहता अशा प्रकारचे वाद निर्माण होणे आणि वाढणे अपरिहार्य दिसत आहे. अर्थात राज्याचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री अशा प्रकारचे वादग्रस्त विधाने करण्याचे काम फक्त महाराष्ट्रातच सुरू आहे असे नाही, तर अनेक राज्यांमध्ये मंत्र्यांचा तोल सुटत असल्याने वाद निर्माण होत आहेत. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही सर्वांसमोर एका डॉक्टराला अर्वाच्य शब्दात झापल्याचा विषयही सध्या तापला आहे. लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणार्या आमदारांना आणि मंत्र्यांना आपण सार्वजनिक ठिकाणी काय बोलतो आणि काय वागतो याचे भान नसेल तर आता त्यांना एका विशिष्ट प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. खरे तर सरकारी पातळीवर आणि पक्ष पातळीवरसुद्धा नव्याने आमदार झालेल्या किंवा नव्याने मंत्री झालेल्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी कशाप्रकारे वर्तन ठेवावे याबाबत काही सूचना असतात. पण तरीसुद्धा राजकीय नेत्यांना भान राहत नाही आणि वाटेल ती डायलॉगबाजी करून वाद निर्माण केले जातात. कोणत्याही पक्षाची किंवा सरकारची भूमिका मांडण्यासाठी सरकारने किंवा पक्षाने प्रवक्त्यांची नेमणूक केलेली असते. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रवक्त्यांचे महत्त्व झपाट्याने कमी होत चालले आहे. अनेक वेळा हे प्रवक्तेसुद्धा वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने संबंधित पक्षच अडचणीत येऊ लागले आहे. पक्षाची भूमिका मांडण्याचे काम प्रवक्त्याचे असते, कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये याची काळजी घेणेसुद्धा त्याच्याच हातात असते. पण प्रवक्त्यांच्या विधानांमुळेसुद्धा राजकीय वाद निर्माण झाल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. अनेक वेळा अशा वादग्रस्त विधानांमुळे मूळ विषय बाजूलाच राहतो आणि या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादावरच चर्चा रंगते.