अग्रलेख: सज्जता कोणाची?

जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. पुन्हा एकदा हे राज्य राजकारणाकडे परतत आहे ही चांगली गोष्ट. वास्तविक लोकसभा निवडणुकीतही राज्यात चांगला उत्साह दिसून आला होता. मात्र, लोकसभेतील विजयी उमेदवार दिल्लीला जातात. विधानसभेची निवडणूक जिंकणारे आपल्या राज्याचे कारभारी असतात. त्यामुळे बर्याच काळानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमध्ये रंगत निर्माण होणार आहे. तथापि, या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून कितीही दावे केले जात असले, तरी ते पूर्णत: सज्ज नाहीत हेही स्पष्ट दिसते आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह राज्याचा धावता दौरा केला. निवडणुका जाहीर झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट. त्यात त्यांनी अत्यंत मोजका संवाद माध्यमांशी साधला. निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे बोलण्यासारखे बरेच असते.
कोणत्याही मुद्द्यावरून ते अचाट विधाने करू शकतात. तसे काल राहुल अथवा खर्गे यांनी केले नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांशी राहुल यांनी जो संवाद साधला, त्याला ठळक प्रसिद्धी मिळाली. पक्षाच्या लोकांशी जसे बोलावे लागते तेच राहुल बोलले. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवायचा असतो. भारत जोडो यात्रा पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या वेळी जी लाइन राहुल यांनी पकडली आहे तीच त्यांनी कालही कायम ठेवली. तेव्हा ‘मोहब्बत की दुकान’ आदी शब्द ते वापरायचे. काल त्यात बदल करत तुम्ही ज्या भीतीत जगत आहात ती मला कायमची संपवायची आहे, असे ते म्हणाले. खर्गे काय बोलले याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. किंबहुना ते काही लक्षवेधी बोललेच नाही. या दोघांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. फारूख अब्दुल्ला यांनी त्यांच्या चिरपरिचित फिल्मी स्टाइलने माध्यमांना खाद्य दिले. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसशी युती झाल्याची घोषणा त्यांनी करून टाकली.
सर्व 90 जागा आम्ही लढवणार असल्याचेही ते म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आमच्यासोबत आहेच, मात्र आपल्या पक्षातील सर्व नेतेही आपल्या सोबत असल्याचे त्यांना जाहीर करावे लागले. त्यामागचे कारण अर्थातच हे आहे की काश्मीरच्या संदर्भात आज कोणताही नेता ठामपणे काही बोलू शकत नाही. काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे ते स्वत:ला सांगत होते की पक्षाच्या नेत्यांना की राज्यातील जनतेला हा प्रश्न खरेतर स्वत: अब्दुल्ला यांनाही पडला असेल. काँग्रेसपासून फारकत घेत आपले वेगळे दुकान थाटून बसलेल्या गुलाम नबी आझाद यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच याबाबत स्पष्ट विधाने केली होती. खोटे बोलू नका अशा आशयाची टिप्पणी त्यांनी काश्मीरच्या नेत्यांना उद्देशून केली होती. त्याच सुमारास अशीही माहिती समोर आली होती की, दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या प्रतिसादाची फारूख अब्दुल्ला वाट पाहात आहेत.
त्याकरता त्यांनी दिल्लीत देव पाण्यात सोडले. त्यांनी व त्यांच्या पुत्राने या वावड्या असल्याचे म्हणत त्याचा इन्कार केला, मात्र, ज्या बातम्या आल्या होत्या त्या खोट्या नव्हत्या असे कोणीही सांगू शकेल. विधानसभा निवडणुकीसाठी आता मंच सज्ज झाला आहे. त्याचवेळी हेही स्पष्ट झाले आहे की स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल अशी ताकद कोणत्याच पक्षाकडे नाही. नॅशनल कॉन्फरन्सकडे ती असती तर त्यांनी इतक्या तातडीने काँग्रेसचा हात हातात घेतला नसता. जम्मू-काश्मीरमधील दुसरा कथित प्रबळ पक्ष आहे मेहबुबा मुफ्ती यांचा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी. मेहबुबा यांच्या पक्षाने बराच जनाधार गमावला आहे. तरीही कलम 370 पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन हा पक्ष देतो आहे. ते कशाच्या आधारावर असे बोलत आहेत हे तेच जाणो. भारतीय जनता पार्टीच्या गोटातही दोन दिवसांपूर्वी हालचाल झाली आहे. पीडीपी आणि भाजपला एकत्र आणणार्या राम माधव यांची भाजपने पुन्हा जम्मू-काश्मीरच्या राजकारणात वापसी केली आहे. माधव कदाचित तशी वेळ आलीच आणि मदतीची आवश्यकता भासली तर सोयीचे ठरू शकतात हा त्यामागचा विचार असावा.
जम्मू भागात भाजपचा वरचष्मा कायम राहिला. तथापि, एकट्या जम्मूत सर्व जागा पक्षाला मिळवता येणार नाही व त्यामुळे बहुमताचा आकडाही गाठता येणार नाही. काँग्रेसचीही स्थिती फारशी वेगळी नाही. आझाद फॅक्टरचा त्यांना तोटा होणारच नाही असे नाही. आझादांसोबत गेलेली काही मंडळी पुन्हा स्वगृही परतली असली, तरी प्रत्येक नेत्याला मानणारा एक सामान्य वर्ग असतो. जम्मू भागानेही काँग्रेसला हात दिला, तर पक्ष उभारी घेऊ शकतो. तशी स्थिती आज दिसत नाही. निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव करावीच लागणार आहे. आता एकत्र आलेले काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र राहतील याचीही शाश्वती नाही आणि मेहबुबा आणि भाजप एकत्र येणारच नाहीत याचाही दावा केला जाऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल हा कळीचा मुद्दा ठरू शकेल याचीही हमी नाही.
दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने अर्थात भाजपच्या सरकारने अगोदरच खेळी केली आहे. त्यांनी नायब राज्यपालांचे अधिकार वाढवणार्या दुरस्त्या जुलै महिन्यातच करून घेतल्या आहेत. दिल्लीप्रमाणे या राज्यातही नायब राज्यपालांचा शब्द अंतिम असणार आहे. राज्यात सरकार आले तरीही केंद्राचा शब्द अंतिम असेल अशी ही तजवीज आहे. राहुल गांधी आणि खर्गे यांना याची जाणीव झाली आहेच. त्यामुळे अन्य राज्यांतील निवडणूकपूर्व उत्साह येथे त्यांनी दाखवला नाही. सज्जता कोणाची हे म्हणताना खरेच कोणाची, हाही छुपा प्रश्न डोकावल्याशिवाय राहात नाही.





