अग्रलेख : आयपीएलचे सुपर किंग्ज

जगातील सर्वांत मोठे क्रिकेट लीग असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या 16 व्या हंगामाच्या अंतिम फेरीमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन या मजबूत संघावर मात करून आयपीएल क्रिकेटचे आपणच सुपर किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 16 हंगामांपैकी 10 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या चेन्नई संघाने पाचव्यांदा या स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले आहे. आतापर्यंतच्या सर्व अंतिम फेरीतील सामन्यांपैकी सर्वात चित्तथरारक सामना म्हणून ज्याचे वर्णन केले जाईल अशा या अंतिम सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या खेळीमुळे चेन्नईला पाचव्यांदा हा चषक जिंकण्याचा मान मिळवता आला. गेल्यावर्षी प्रथमच या स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या गुजरात टायटन्स या संघाने पदार्पणातच हा चषक जिंकून एक विक्रम केला होता.
यावर्षीसुद्धा अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर चेन्नईवर हा संघ सहज मात करेल आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवेल असे वाटत होते, पण चेन्नई सुपर किंग्ज या संघाची धुरा ज्या यशस्वी कर्णधारावर आहे, त्या महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वगुणामुळे आणि एकंदर त्याच्या आश्वासक वावरामुळे चेन्नईने आपणच झटपट क्रिकेटमध्ये सुपर किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. गेली काही वर्षे धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू होती. धोनीनेही आपल्या निवृत्तीबाबत कधी स्पष्टपणे काही सांगितले नव्हते; पण आता पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यानंतर अप्रत्यक्षपणे आपल्या निवृत्तीचे संकेत दिले असले तरी आयपीएलच्या निमित्ताने तो चेन्नई सुपर किंग्ज या संघाशी कायम जोडलेला राहील, याबाबत कोणती शंका येण्याचे कारण नाही.
उत्कृष्ट कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून नेहमीच जागतिक पातळीवर महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले जाते. भारतीय क्रिकेट भूमीवर आयपीएलसारखे फ्रेंचाईजी क्रिकेट जेव्हा सुरू झाले तेव्हापासून गेल्या सोळा वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंनी आपल्या निष्ठा बदलल्या होत्या आणि दरवर्षी किंवा ठरावीक कालावधीनंतर त्यांनी संघही बदलले होते; पण आयपीएलच्या स्थापनेपासूनच धोनीने चेन्नई संघाची धुरा वाहिली होती. स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे या संघावर दोन वर्षांची बंदी आल्याच्या कालावधीमध्ये फक्त धोनी आणि त्याचे काही सहकारी इतर संघांकडून खेळले होते अन्यथा सुपर किंग्ज म्हणजेच महेंद्रसिंग धोनी असे समीकरण तयार झाले होते. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी चमक दाखवल्यामुळे नंतर त्यांना भारतीय क्रिकेट संघातही स्थान मिळाले आहे.
ज्या काही परदेशी खेळाडूंना आपल्या देशात चमकदार कामगिरी करता येत नव्हती त्या खेळाडूंनाही चेन्नईच्या व्यासपीठावर चांगली कामगिरी करून आपल्या देशासाठी चांगला संदेश देता आला. जगातील सर्वांत श्रीमंत आणि मोठी क्रिकेट लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या निमित्ताने जागतिक पातळीवरील गुणवत्ता समोर येते आणि या गुणवान खेळाडूंना आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग मोकळा होतो हे आजवर अनेकवेळा सिद्ध झाले आहे. या वेळेच्या स्पर्धेने सुद्धा अनेक गुणवान खेळाडूंची गुणवत्ता समोर आली आहे आणि भविष्यात हे खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना निश्चितच दिसणार आहेत. स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा करणारा गुजरात टायटन संघाचा शुभमन गिलने ज्या प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, ते पाहता आगामी काही वर्षे भारतीय संघातील त्याचे स्थान निश्चितच पक्के झाले आहे. राजस्थान रॉयलकडून खेळणारा यशस्वी जयस्वाल असो किंवा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा रिंकू सिंग असो किंवा गेली काही वर्षे चेन्नई संघातून चमकदार कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड असो या सर्व खेळाडूंकडे भारतीय क्रिकेट संघाचे भवितव्य म्हणूनच पाहिले जात आहे.
एकीकडे या युवा खेळाडूंनी अशा प्रकारची गुणवत्ता दाखवली असतानाच विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी यासारख्या सीनियर खेळाडूंनी सुद्धा आजही आपण फॉर्मात आहोत आणि उपयुक्त आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशातील गोलंदाजांचा मुकाबला करण्याची संधी युवा खेळाडूंना मिळत असल्यानेच आपोआपच त्यांची जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानसिकता तयार होते. याचा फायदा भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांना निश्चितपणे होणार आहे. भारतात राष्ट्रीय पातळीवर खेळण्यात येणारा रणजी करंडक स्पर्धा किंवा आयपीएलसारख्या स्पर्धात्मक क्रिकेटमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात लपलेली गुणवत्ता समोर येते. एकदिवसीय क्रिकेट असो, कसोटी क्रिकेट असो किंवा टी-20 प्रकारचे क्रिकेट असो या प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्पेशालिस्ट असे खेळाडू तयार होतील, एवढी भारतीय क्रिकेटची बेंच स्ट्रेंग्थ प्रबळ झाली आहे.
या आयपीएलमध्ये के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंची उपस्थिती नसतानासुद्धा त्यांच्याऐवजी खेळवण्यात आलेल्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या आयपीएल हंगामामध्ये 10 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी काही संघांची कामगिरी अतिशय सुमार झाली असली तरी त्या संघातील काही युवा खेळाडूंनीसुद्धा आपली चमकदार कामगिरी समोर आणली आहे आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे. अंतिम फेरीत खेळलेले चेन्नई सुपर किंग्ज किंवा गुजरात टायटन या संघांव्यतिरिक्त अंतिम चारमध्ये असलेले मुंबई इंडियन्स आणि लखनौ या संघामध्येसुद्धा अनेक खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याशिवाय राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यामध्येसुद्धा काही भारतीय खेळाडूंनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
भारतीय क्रिकेटचे भवितव्य म्हणूनच या सर्व खेळाडूंकडे बघण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ रेकॉर्डचा विचार करता यावर्षीच्या हंगामामध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद मिळवले असले तरी क्रिकेटच्या भविष्याचा विचार करता क्रिकेटच्या स्पिरीटचाच विजय झाला आहे असे म्हणावे लागेल. पाचव्यांदा विजेतेपद मिळवणाऱ्या धोनीच्या संघाचे अभिनंदन करत असतानाच उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण क्रिकेटचे प्रदर्शन करणाऱ्या गुजरात टायटनच्या संघाच्याही पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हवी या स्पर्धेमध्ये गुणवत्ता पूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना सुद्धा भारतीय संघात प्रवेशासाठी दारे खुली झाली असल्याने त्यांनासुद्धा त्यांच्या आगामी कामगिरीसाठी शुभेच्छा द्यायला हव्यात हे सर्वच जण भारतीय क्रिकेटचे सुपर किंग आहेत.





