अग्रलेख : विषारी हवा

भारतात हवा प्रदूषणाची काय स्थिती आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. तथापि, ज्याकडे आपण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो अथवा टाळायला पाहतो ती बाब जेव्हा धक्कादायक आकडेवारीसह समोर येते तेव्हा हादरतो. ‘द लॅन्सेट’चा एक अहवाल गुरुवारी आला. त्यानुसार भारतातील 10 मोठ्या शहरांतील 100 पैकी 7 मृत्यू हे केवळ विषारी हवेमुळे होत आहेत. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये हवेमुळे फुफ्फुसांची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याचे आढळून आले आहे. हवेतला विषारीपणा असाच वाढत राहिला तर येणार्या काळात प्रत्येकाचाच श्वास गुदमरणार आहे. घराबाहेर पडणेही अशक्य होईल अशी स्थिती आता फार लांब नाही असेच सूचित होऊ लागले आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, पुणे, मुंबई, शिमला आणि वाराणसी आदी शहरांमध्ये हवेच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. त्यात असे काही घटक आढळून आले आहेत की जे कॅन्सरला आमंत्रण देणारे आहेत. यूनिसेफ आणि अमेरिकेच्या हेल्थ इफेक्टस् इन्स्टिट्यूटच्या अलीकडच्या एका अहवालात म्हटले आहे की 2021 मध्ये भारतात 21 लाख जणांचा मृत्यू हवा प्रदूषणामुळे झाला आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे ज्यांनी जग बघितलेच नाही अशा 1 लाख 69 हजार मुलांचा त्यात समावेश आहे. सरासरी पाच वर्षांच्या आतच विषारी हवेने त्यांचा बळी घेतला आहे ही बाब अस्वस्थ करणारी आहे.
या प्रदूषणाचा गर्भवती महिलांवर प्रभाव पडतो व मूल जन्मत:च अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येते. भारतातील सगळीच महानगरे आता प्रदूषण हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे मानून जगू लागली आहेत. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील सगळ्याच शहरांतील हवा नासली तरी काय प्रसंग उद्भवेल याचा विचार करतानाही भीती वाटू लागते. भारत ज्या दक्षिण आशियात येतो तेथे हवा प्रदूषणामुळेच सर्वाधिक मृत्यू होतात. त्यानंतर रक्तदाब, कुपोषण, तंबाखूचे सेवन आदींमुळे मृत्यू होतात. गरीब देशांत गरिबी आहेच. असमानताही आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणापासून बचाव वगैरे बाबी येथील नागरिकांच्या डोक्यात नसतात. त्याचे सगळे लक्ष्य दोन वेळेचे जेवण कसे मिळेल यावर केंद्रित असते. प्रदूषणाबाबत जागृती करण्याचे प्रयत्न यामुळे तुटपुंजे ठरतात. नाही म्हणायला जाहिरातबाजी, अभियान राबवले जातात. काही कार्यक्रम चर्चा परिसंवादही होतात. तथापि, ज्यांना अगोदरच ही समस्या माहिती आहे त्यांचाच अशा कार्यक्रमात सहभाग होतो व तोही त्यांना चमकण्यासाठी एक व्यासपीठ देण्याचेच काम करतो, यापेक्षा फारसे काही त्यातून साध्य होत नाही. रस्त्यावर उडणारी धूळ, जाळले जाणारे राब, त्यानंतर दिवाळीतील फटाके, वाहनांचा धूर या सगळ्यांचा रोजच्या रोज सामना करावा लागतो. ते आपल्या इतक्या अंगवळणी पडले आहे की त्याच्या धोक्याचा विचारही मनाला शिवत नाही.
उलट रस्त्यावर उतरल्यावर धूळ आणि धूर नसेल तर चुकल्यासारखेच होण्याची शक्यता अधिक असते. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न होताना दिसतात. विविध उपायांची घोषणा केली जाते. तरीही काही काळ गेल्यानंतर प्रदूषणाची पातळी आणखी वाढल्याचीच आकडेवारी समोर येते. त्यावेळी या समस्येचे मूळ कशात आहे आणि आपण जे प्रयत्न करत आहोत ते तरी योग्य दिशेने केले जात आहेत का असे प्रश्न पडतात. जगातल्या प्रदूषित शहरांची गेल्या 20 वर्षांपासून जी आकडेवारी नियमितपणे मांडली जाते आहे त्यात भारतातील काही शहरांची नावे अग्रक्रमाने असतात. याचा दुसरा अर्थ होतो की प्रदूषणाचे हे आव्हान संपुष्टात आणणे बाजूला ठेवू किमान ते थोपवण्यातही आपण अयशस्वी ठरतो आहे. उलट कळत नकळत आपल्या हातून अशीच कामे अधिक होत आहेत ज्यामुळे हवा जास्त विषारी होण्याला हातभार लागतो. लोकसंख्या जशी वाढते आहे तशा गरजा वाढत आहेत व त्यानुसार उद्योगांमध्ये वाढ नोंदवली जाते आहे. या वाढीकडे प्रगतीचे निदर्शक म्हणून पाहिले जाते मात्र त्याचे नियमन योग्य रित्या होत नाही. त्याला बेफिकिरी ते भ्रष्टाचार अशी अनेक कारणे आहेत. कारखान्यांमधून सोडली जाणारी घातक रसायने आणि वायू हे आज न उद्या आपल्याच प्राणाशी खेळणार आहे याचाही मग विसर पडतो. घरे, कॉलन्या आणि वस्त्याही वाढल्या आहेत.
ज्या आवश्यक सुविधा हव्या आहेत त्याचीही पूर्तता होत नसल्यामुळे सगळा खुल्लमखुल्लाच प्रकार शहरांमध्ये सुरू झाल्याचे दिसते. प्रत्येक व्यक्ती, शासन आणि प्रशासन आपापल्या जबाबदार्यांपासून दूर जातानाच दिसतात. देशपातळीवर आणि राज्य पातळीवरही सामाजिक, आर्थिक, नैतिक विकासाच्या गप्पा होतात. राजकीय विधानेही केली जातात. त्यात कधी कधी हवा आणि प्रदूषणाचे विषय डोकावतात. तथापि, तो केवळ एक सोपस्काराचा भागच अधिक असतो. धोक्याची जाणीव करून देणारी विधाने असतात मात्र त्यावर पुढील कृती काय असेल याचा गोषवारा नसतो. त्याबद्दल प्रामाणिक प्रयत्न करण्याची इच्छा नसते आणि शक्तीही नसते. द लॅन्सेट आणि यूनिसेफचे कथित अहवाल केवळ परीक्षा तोंडावर आलेल्या विद्यार्थ्याला पालक जशी आठवण करून देतात तशीच आठवण आपल्याला हवेच्या धोक्याबाबत करून देत असतात. तेवढ्यापुरता त्याचा विचार करून पुन्हा आपल्या कामाला जुंपले जाते. मात्र प्रत्यक्षात हे आकडे आपल्याला वास्तवाचे भान करून देणारे असतात आणि आता जरी दीर्घकालीन विचार करून ठोस उपाययोजना आखल्या तर भविष्यातील चित्र सुखद असू शकते असे सूचवत असतात.





